मनपा निवडणुकीबाबत काँग्रेसची उद्या मुंबईत बैठक- प्रदेशाध्यक्षांसोबत होणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:12+5:302021-02-23T04:38:12+5:30
कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आज मंगळवारी व बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या निवड मंडळाची ...
कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी आज मंगळवारी व बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या निवड मंडळाची बैठक होत आहे. कोल्हापूर जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी बुधवारी दुपारी ४ वाजता चर्चा होणार आहे. कोल्हापूरसह राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक महिला विकास महामंडळ, नरिमन पाॅईंट येथे होणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिमेची रणनीतीे यावेळी निश्चित केली जाणार आहे. बैठकीस महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.