इचलकरंजीत काँग्रेस आघाडीला खिंडार

By admin | Published: October 13, 2015 12:29 AM2015-10-13T00:29:36+5:302015-10-13T00:38:39+5:30

शिक्षण मंडळ राजकारण : सभापती ‘शविआ’चा होण्याचे संकेत

Congress in Ichalkaranji | इचलकरंजीत काँग्रेस आघाडीला खिंडार

इचलकरंजीत काँग्रेस आघाडीला खिंडार

Next

इचलकरंजी : नगरपालिका शिक्षण मंडळातील कॉँग्रेस आघाडीला खिंडार पडले असून, मंडळाचा आगामी सभापती शहर विकास आघाडीचा निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नगरपालिकेतील राजकीय स्थित्यंतरामुळे हा बदल घडत आहे.
शिक्षण मंडळात कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचा एक, शहर विकास आघाडीचे तीन व भाजपचे दोन असे सदस्य संख्येचे बलाबल आहे. यापैकी कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी शिक्षण मंडळात आहे. कॉँग्रेसचे तौफिक मुजावर यांनी राजीनामा दिल्यापासून शिक्षण मंडळाचे सभापतिपद रिक्त आहे, तर उपसभापती असलेले नितीन कोकणे हे प्रभारी सभापती म्हणून काम पाहत आहेत.नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी त्यांच्या पदाचा पक्षांतर्गत ठरलेला कालावधी संपल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंडखोरी केली. त्यामुळे पालिकेमधील शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे गटाने नगराध्यक्षांना पाठिंबा दिला. त्यामुळे नाइलाजास्तव कॉँग्रेस पक्षालाही नगराध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी लागली. अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात तौफिक मुजावर यांनी राजीनामा दिला असला तरी उपसभापती नितीन कोकणे हे कारंडे गटाचे असल्यामुळे त्यांनी सभापतिपदासाठी निवडणूक लावलीच नाही. त्यामुळे गेले सात महिने कोकणे हेच प्रभारी सभापती म्हणून शिक्षण मंडळाचे कामकाज पाहत आहेत.
अशा पार्श्वभूमीवर सभापती निवडीसाठी जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी १५ आॅक्टोबरला शिक्षण मंडळ सदस्यांची विशेष सभा आयोजित केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळामधील सदस्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉँग्रेसच्या सहापैकी एक सदस्य शहर विकास आघाडीच्या हाताला लागला आहे, तर कोकणे यांनी शहर विकास आघाडीबरोबर मिळते-जुळते घेतले असल्याने बारा सदस्यांच्या शिक्षण मंडळात कॉँग्रेसकडे पाच आणि कॉँग्रेसच्या विरोधात सात अशी
स्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे कॉँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

आज कॉँग्रेसची बैठक
गुरुवारी (१५ आॅक्टोबर) होणाऱ्या शिक्षण मंडळाकडील सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. शहर कॉँग्रेस समितीत होणाऱ्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींकडून सदस्यांची मते अजमावली जाणार आहेत. त्याप्रमाणे सभापती निवडीसाठी व्यूहरचना आखली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

‘शविआ’ची समिती
सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शविआ’चा सभापती होण्यासाठी सोमवारी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सहाजणांची समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये जयवंत लायकर, अजित जाधव, महादेव गौड, तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे व सुनील महाजन यांचा समावेश आहे, तर सभापतिपदासाठी राजू हणबर व इम्रान बागवान हे इच्छुक आहेत.

Web Title: Congress in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.