हातकणंगलेत काँग्रेस, जनसुराज्य, भाजप सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:50 PM2018-03-18T23:50:50+5:302018-03-18T23:50:50+5:30

Congress, Janasurajya, BJP active in Hatkanangle, active | हातकणंगलेत काँग्रेस, जनसुराज्य, भाजप सक्रिय

हातकणंगलेत काँग्रेस, जनसुराज्य, भाजप सक्रिय

Next

आयुब मुल्ला ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आपली राजकीय यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील पहिली सुरुवात जाहीरपणे काँग्रेस व जनसुराज्यने केली आहे, तर भाजपनेसुद्धा हालचाल सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी आपण निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे कार्यक्रमातून स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे आमदार हट्ॅट्रिक करणार, अशी आशा स्वत: व्यक्त करीत आहेत. एकूणच उन्हाळ्यात राजकीय हवा मात्र तापू लागली आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात उघडपणे निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी गत आठवड्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीत भूमिका मांडली. त्यानुसार गुढीपाडव्यापासून जिल्हा बँकेचे संचालक राजू आवळे मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे विधानसभेचे उमेदवार राजू आवळे असतील हे प्राथमिक टप्प्यात स्पष्ट झाले असून, जयवंतराव आवळे आता लढणार नाहीत, हे त्यावरून सिद्ध झाले आहे.
जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वत:चा वाढदिवस प्रथमच सार्वजनिक स्वरूपात साजरा केला. कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी माजी मंत्री विनय कोरे यांनी, राजीव आवळे यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी सर्वांनी ताकद द्या, असे आवाहन केले. तेव्हापासून आवळे यांनी आपली यंत्रणा गतिमान केली आहे.
भाजपही जिल्हा परिषद व हुपरी नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने आमदारकीच्या यशाला गवसणी घालता येते काय, या प्रयत्नात आहे. या पक्षाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक अभयकुमार वंटे यांचे नाव चर्चेत आहे. दोन आठवड्यांपूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अभयकुमार वंटे यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केल्याचे समजते. सध्या वंटे यांनीही मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. तालुक्यात अनेक राजकीय गट आहेत; पण ते कोणत्याही पक्षात सक्रिय नाहीत, अशा गटांचे वंटे यांना समर्थन मिळू शकते, असे बोलले जात आहे. त्यांनी टीमवर्कद्वारे संपर्क वाढविला आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे आगामी विधानसभा निवडणुकीकडे विजयी हॅट्ट्रिक करण्याच्या दृष्टीने पाहत आहेत. त्यांना यापूर्वीच्या निवडणुकींमध्ये इतर पक्षातील नाराज, तसेच अन्य राजकीय गटांनीही मदत केली; पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. वेगवेगळे पर्यायही समोर आले आहेत, अशावेळी सुरुवातीची गट बांधणी टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनीही पेठवडगावमध्ये मेळावा घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. अविनाश सावर्डेकर यांनीही संपर्क वाढविला आहे. त्यांचा अद्याप पक्ष कोणता हे निश्चित नाही; पण तयारी जोरदार सुरू केली आहे.

Web Title: Congress, Janasurajya, BJP active in Hatkanangle, active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.