Kolhapur Politics: ..मग शेट्टींना आम्ही कसे फसवले?, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर
By विश्वास पाटील | Published: June 17, 2024 07:03 PM2024-06-17T19:03:56+5:302024-06-17T19:06:24+5:30
विधानसभेला एकसंधपणे सामोरे जाणार
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत यावेत, यासाठी पहिल्यापासून मी प्रयत्न केला; पण त्यांना फक्त उद्धवसेनेचीच सोबत हवी होती. दोन्ही काँग्रेससोबत येण्यास नकार दिल्याने वरिष्ठ पातळीवर समज-गैरसमज झाला. आम्ही कोणाचीही फसवणूक केली नसल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार पाटील म्हणाले, राजू शेट्टी हे आघाडीसोबत यावेत, यासाठी आग्रह धरणारा मी एकमेव होतो. त्या दृष्टीने आघाडीच्या पातळीवर चर्चाही झाली होती. आघाडीकडून एखादी जागा सोडल्यानंतर त्याच्या बदल्यात राज्यात काहीतरी भूमिका जाहीर करायला हवी, यासाठी लेखी स्वरूपात चर्चा झाली होती. बुलढाण्याबाबत त्यांना तांत्रिक अडचण होती, तरीही ‘हातकणंगले’त पाठिंबा जाहीर करा, राज्य कार्यकारिणी घेऊन उर्वरित ठिकाणी आघाडीला पाठिंबा देऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.
तसे घडले नाही. त्यामुळे फसवणूक आघाडीने केलेली नाही. दोघांमध्ये सुसंवाद झाला नाही, अंतिम टप्प्यात शेवटच्या दोन दिवसांत आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करून सगळ्या गोष्टी सांगितल्या. नंतर ते तयार झाले होते; पण तोपर्यंत वरिष्ठ पातळीवर समज-गैरसमज झाल्याने चर्चा फिस्कटली.
विधानसभेला एकसंधपणे सामोरे जाणार
‘स्वाभिमानी’ आमच्यासोबत हवी, म्हणून लोकसभेला भूमिका घेतली होती. विधानसभेला आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आघाडीत कोणाला घ्यायचे याचा निर्णय राज्यपातळीवर होईल. महाविकास आघाडी म्हणून विधानसभा एकसंधपणे लढणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.