अटी घालून लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार का, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:22 IST2025-01-04T16:22:40+5:302025-01-04T16:22:54+5:30
..तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल

अटी घालून लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार का, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर : लाडकी बहीण योजना सुरु झाली त्यावेळी अर्थ खात्याने त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असे लिहिले होते का ? लिहिले होते तर त्यावेळी त्या का घातल्या नाहीत? या अटी व शर्ती आताच का घालता, या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार का ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सरकारला केला.
आमदार पाटील म्हणाले, शासनाच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींचे अर्ज भरले गेले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अटी व शर्ती आताच का घालता? या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणे गरजेचे आहे. सत्ता कुणाची आहे यापेक्षा सिस्टिम काय करते, हे महत्त्वाचे आहे. मूळ आरोपी सापडल्याशिवाय या प्रकरणाचा उलगडा होणार नाही. वेगळ्या दिशेने हे प्रकरण घेऊन जात असल्याचा संशय आहे. प्रीपेड मीटरचे २७ हजार कोटींचे टेंडर चार-पाच कंपन्यांना दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीपुरते हे थांबवले होते. आता परत हे मीटर बसवणे सुरु झाले. लोकांचा याला विराेध असून, आम्हीही याला विरोध करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
..तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल
१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन कार्यक्रमांसाठी पालकमंत्री नसतात तर त्या जिल्ह्याचे आर्थिक नियोजन करण्याची भूमिका पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे खातेवाटप, पालकमंत्री नियुक्तीचा वाद लवकरच मिटावा अन्यथा आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना उपोषणाला बसावे लागेल, अशी कोपरखळी आमदार सतेज पाटील यांनी लगावली.
आता रखडलेले प्रश्न मार्गी लावा
कोल्हापूरच्या जनतेने महायुतीला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी, मंत्र्यांनी कोल्हापूरचे आयटी पार्क, शाहू मिलचा विस्तार, कोल्हापुरातील रस्त्यांचे नियोजन, रखडलेले प्रकल्प, हातकणंगलेतील लॉजिस्टिक पार्क, गडकिल्ल्यांचे संवर्धन ही कामे पाच वर्षांत पूर्ण करावीत, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
राजू शेट्टी यांचे नियोजित आंदोलन रास्तच
केंद्र शासनाकडे साखरेची एमएसपी वाढवावी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहेत. एमएसपी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांना चार पैसे जास्त देणे कारखान्यांना परवडणार नाही. प्लेज कर्ज जे मिळते ते शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सरकारला साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यायचे नाहीत. नेमके सरकारचे धोरण काय आहे हेच कळत नाही. त्यामुळे राजू शेट्टी याबाबत आंदोलन करणार असतील तर ते रास्त असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.