सावकरांना काँग्रेस आघाडीचा ‘बाय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:54 AM2019-09-17T00:54:56+5:302019-09-17T00:55:00+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांच्यामागे रसद पुरविण्याच्या हालचाली आघाडीत सुरू आहेत.
कोरे महायुतीत असले तरी स्थानिक राजकारणात ते आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये भूमिका जाहीर न करता मदत केल्याने त्यांचा पैरा फेडण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस ५, राष्टÑवादी ३ व स्वाभिमानीने १ जागेवर लढावे, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, ‘स्वाभिमानी’ने ‘हातकणंगले’वर दावा सांगितल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे राज्याचे जागावाटप निश्चित झाले आहे. दोन्ही काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागांचे वाटपही बऱ्यापैकी पूर्ण झाले असून ‘कोल्हापूर उत्तर’, ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ या जागा काँग्रेसला मिळणार आहेत. ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी-भुदरगड’ या राष्टÑवादीला, तर ‘शिरोळ’ स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात येणार आहेत. ‘शाहूवाडी’तून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सभापती अमरसिंह पाटील यांनी मागणी केली आहे; पण जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीसह स्थानिक राजकारणात माजी मंत्री विनय कोरे हे दोन्ही काँग्रेससोबत राहिले आहेत. अटीतटीच्या विधानपरिषद निवडणुकीत कोरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मागे ताकद लावली होती, तर मावसभाऊ आमदार सत्यजित पाटील हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिल्याचा राग आमदार पाटील यांच्या मनात आहे. स्थानिक राजकारणात त्यांची महाडिक विरोधातच भूमिका असल्याने आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांचे पाठबळ राहणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीत असतानाही कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये आपली भूमिका जाहीर केली नव्हती; पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, हे जगजाहीर आहे. त्यामुळेच लोकसभेचा पैरा फेडण्यासाठी राजू शेट्टी दोन्ही काँग्रेसशी सहमती दर्शवतील, अशी चर्चा आहे.
‘स्वाभिमानी’ने हातकणंगलेवर दावा सांगितला आहे; पण येथून काँग्रेसतर्फे राजू जयवंतराव आवळे हे इच्छुक आहेत. त्यांनी लढण्याची पूर्ण तयारी केल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. राजू शेट्टी हे मराठवाड्याच्या दौºयावर आहेत, ते शुक्रवारी (दि. २०) कोल्हापुरात येत आहेत. त्यानंतरच ‘हातकणंगले’चा पेच सुटणार आहे.