राष्ट्रवादीमुळेच काँग्रेसचे नुकसान
By Admin | Published: November 15, 2016 12:03 AM2016-11-15T00:03:26+5:302016-11-15T00:03:26+5:30
अशोक चव्हाण : रहिमतपूर येथील प्रचारसभेत टीकास्त्र
रहिमतपूर : ‘काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादीबरोबरीच्या आघाडीमुळेच झाले. त्यामध्ये सर्वांत मोठा तोटा पश्चिम महाराष्ट्राला झाला. काँग्रेस पक्ष भक्कम करण्यासाठी भविष्यात स्वबळावर निवडणुका लढण्याचे निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
रहिमतपूर येथे सोमवारी पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, प्रकाश पाटील, तौफिक मुलाणी, नीलेश माने, धैर्यशील कदम, अॅड. विजय कणसे, भीमराव पाटील, किरण बर्गे, किशोर बाचल, संपत माने, जाकीर पठाण, अंकुशराव भोसले उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘रहिमतपूर पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसने पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविली आहे. त्यामुळे हा विजयाचा ऐतिहासिक संदेश मंत्रालयापर्यंत जावा व पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या विजयाची सुरुवात झाली आहे, हे कळू द्यात.’
यावेळी आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, अजित पाटील-चिखलीकर, नीलेश माने, तौफिक मुलाणी यांची भाषणे झाली. यावेळी काँग्रेसचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.
कार्यक्रमासाठी सतीश भोसले, गौतम जाधव, शंकर भोसले, विकास माळी, रावसाहेब माने, शिवाजीराव माने, दयानंद भोसले, जितेंद्र भोसले, उमेश साळुंखे, उमेश ताटे, डॉ. शंकर पवार, जनार्दन चव्हाण, बबनराव पवार उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांनी प्रास्ताविक केले. दीपक साबळे, सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. धैर्यशील सुपले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नोटा बदलण्याने अर्थव्यवस्था खिळखिळी...
‘भाजपच्या नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह नोकरदारांची, सामान्य जनतेची अवस्था दयनीय व देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. काळा पैसा शोधायला हवा, त्याला आमचा विरोध नाही; पण देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार कोण?,’ असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.
बारामतीची चाकरी करणाऱ्यांकडून घराघरांत भांडणे लावण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. ज्या पक्षाचा इतिहास गद्दारीचा आहे, त्या पक्षाची सूज उतरविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मागेल ती ताकद पक्षीय पातळीवर दिली जाईल.
- जयकुमार गोरे, आमदार