‘पी. एन.- अरुण नरकें’ची गट्टी, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवी नांदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:08 PM2023-02-04T17:08:28+5:302023-02-04T17:09:32+5:30
‘गोकुळ’सह ‘लोकसभा’ व विधानसभा निवडणूकीत एकत्र राहण्याचा निर्णय
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्यात शुक्रवारी नव्याने गट्टी झाली. दोन्ही नेत्यामंध्ये शाहूपुरी येथील श्रीपतरावदादा बँकेत बैठक होऊन ‘गोकुळ’सह ‘लोकसभा’ व विधानसभा निवडणूकीत एकत्र राहण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. कुंभी कासारी साखर कारखाना निवडणुकीच्या तोंडावर या युतीमुळे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना चांगलाच हादरा बसला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. चेतन नरके यांच्या संभाव्य उमेदवारीवरून दोन नेत्यांचे मनोमिलन झाले.
चेतन नरके यांनी आयोजित केलेल्या ‘डेअरी परिषदेत’ आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ‘चेतन’ यांना सोबत घेण्याचे आवाहन अरुण नरके यांनी केले होते. त्यानंतर पाटील, नरके यांच्या युतीच्या दृष्टीने चर्चा सुरू झाली. शुक्रवारी दुपारी आमदार पी. एन. पाटील व अरुण नरके यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी जिल्ह्याच्या राजकारणात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
‘कुंभी’च्या मागील निवडणुकीत जिल्हा बँकेचे माजी संचालक संदीप नरके यांनी चंद्रदीप नरके यांना थेट आव्हान दिल्यापासून नरके कुटुंबात दुरावा निर्माण झाला. त्याचे पडसाद विधानसभा व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत उमटले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत अजित नरके यांना विरोधी पॅनेलमधून उभे करत चंद्रदीप नरके यांनी अरुण नरके यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
तरीही चेतन नरके हे मोठ्या फरकाने विजयी झाले. तेव्हापासून दरी वाढत गेली. ‘कुंभी’च्या निवडणुकीत चेतन नरके यांनी उतरावे, यासाठी त्यांच्या समर्थकांचा दबाव होता, मात्र त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केल्याने ‘कुंभी’च्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. ‘गोकुळ’च्या माध्यमातून अरुण नरके यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यात आमदार पाटील व ते एकत्र आल्याने जिल्ह्याचे राजकारण भक्कम होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात नवी नांदी!
एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडीक व अरुण नरके यांची ‘मनपा’ आघाडी भक्कम होती. मध्यंतरीच्या काळात ‘करवीर’च्या राजकारणामुळे नरके हे पाटील यांच्यापासून दूर गेले होते. मात्र पुन्हा नरके-पाटील एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणाची नवी नांदी सुरू झाली आहे.
‘कुंभी’च्या प्रचारात चेतन नरके उतरणार
कुंभीची रणधुमाळी सुरू असून त्याच्या प्रचारात विरोधी शाहू आघाडीकडून चेतन नरके उतरणार आहेत. आमदार पी. एन. पाटील व अरुण नरके यांची लवकरच एक सभा होणार आहे.