Kolhapur: काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:53 PM2024-05-23T15:53:29+5:302024-05-23T15:57:17+5:30

कोल्हापूर : अमर रहे अमर रहे अशा गगनभेदी घोषणा, पाणावलेले डोळे अन् क्षणाक्षणाला दाटून येणारा हुंदका अशा भावपूर्ण वातावरणात ...

Congress MLA P.N Patil was cremated with state pomp | Kolhapur: काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

Kolhapur: काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील अनंतात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

कोल्हापूर : अमर रहे अमर रहे अशा गगनभेदी घोषणा, पाणावलेले डोळे अन् क्षणाक्षणाला दाटून येणारा हुंदका अशा भावपूर्ण वातावरणात काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या पार्थिवावर गुरुवारी हजारोंच्या उपस्थितीत सडोली खालसा (ता. करवीर) या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा राजेश व राहुल पाटील यांनी पार्थिवाला अग्नी दिला. आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देताना उभा भोगावती काठ हुंदक्यांनी गहिवरून गेला.

राज्य सरकारच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. आमदार पाटील यांचे पार्थिव त्यांच्या राजारामपुरीतील घरी, काँग्रेस समिती कार्यालय व फुलेवाडी येथील गॅरेजमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर ते साडेअकराच्या सुमारास त्यांच्या सडोली खालसा या मूळ गावी नेण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी गावोगावी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. 

कोल्हापूरपासून ते सडोली खालसा गावापर्यंत वाटेतील सर्वच गावांमध्ये या लाडक्या नेत्याच्या पार्थिवावर फुले वाहत महिला, तरुण मुले, आबालवृद्धांनी शेवटचा निरोप दिला. वाशी, कांडगाव, हळदी या गावांमध्ये रस्त्यावर थांबून नागरिकांनी पी. एन. पाटील यांचे पार्थिव असलेल्या रुग्णवाहिकेवर फुलांचा सडा वाहिला. वाशी, कांडगाव, हळदीमध्ये पार्थिव असलेली रुग्णवाहिका आल्यानंतर नागरिकांनी एकच गलका केला. सडोली खालसा गावात पार्थिव आणल्यानंतर उभा गाव शोकसागरात बुडाला. गावच्या सुपुत्राला अखेरचे पाहण्यासाठी गावच्या वेशीवर उभारलेल्या महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. महिला, तरुण मुले, आबालवृद्धांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. लोक रुग्णवाहिकेच्या मागे धावत होते. रुग्णवाहिका त्यांच्या वडिलोपार्जित घरी येताच ग्रामस्थांनी एकच आक्रोश केला. 

आपल्या लाडक्या सुपुत्राच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना प्रत्येकजण भावविवश झाला होता. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर पार्थिव सजवलेल्या रथातून गावाबाहेरील माळरान असलेल्या क्रीडांगणावर नेण्यात आले. विस्तीर्ण मैदानात सजवलेल्या चबुतऱ्यावर आमदार पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.तत्पूर्वी, बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. 'आमदार पी. एन. पाटील अमर रहे' या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

ग्रामस्थांशी नाळ तुटू दिली नाही

गणपतीच्या सणात चावडीसमोर तरुण मंडळांकडून अन्नदान केले जाते. पी. एन. पाटील हे पूर्वी या मंडळाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी न चुकता ते या कार्यक्रमाला उपस्थित राहून वाढपी बनून जेवण वाढत असल्याची आठवण ग्रामस्थांनी जागविली. गावातील कोणाच्याही घरचे लग्नकार्य असले तरी ते आवर्जून येत. गावात आले की हनुमान मंदिरातील त्यांचे दर्शन कधीच चुकत नसायचे. कुणाचेही निधन झाल्यावर ते आधार देण्यासाठी धावून येत.

Web Title: Congress MLA P.N Patil was cremated with state pomp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.