काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमकतेकडे!
By admin | Published: January 6, 2015 10:36 PM2015-01-06T22:36:47+5:302015-01-06T23:58:24+5:30
सत्ता संघर्षाची चिन्हे : मोदी लाटेने सत्तेतून बाजूला गेलेल्यांची जनाधार मिळविण्यासाठी धडपड
सातारा : काँग्रेस-राष्ट्रवादीने देश, राज्य अन् जिल्हा पातळीवर पंधरा वर्षे एकत्र राजकारण केले. कोणत्याही निवडणुका असल्या तरी त्यांनी एकत्र लढविल्या होत्या. आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघेही वेगळे झाले. अन् मोदी लाटेपुढे सत्ता गमावून बसले. त्या निवडणुकीत दोघांनीही एकमेकांविरोधात आगपाखड केली. त्यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस अन् राष्ट्रवादी आक्रमक बनत चालली आहे. जनतेचे प्रश्न घेऊन प्रशासकीय कार्यालयांमध्ये भेट देत आहेत.१९९९ पासून राज्य आणि देशपातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली असली तरी जिल्ह्यात मात्र या दोन्ही पक्षांचे नाते विळ्या-भोपळ्याचेही राहिले. या काळात जिल्ह्याने राष्ट्रवादीची कायम पाठराखण केली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ दिली आहे. राज्य पातळीवर एकत्र असलेले नेते जिल्ह्यात आले की एकमेकांवर तोंडसुख घेत होते. त्यामुळे जिल्ह्यात काँगे्रस विरुध्द राष्ट्रवादी असंच चित्र राहिलं.
राजकीय डावपेच अन् सत्तेत असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे कोणाला वेळ देताच आला नाही. त्यातच राष्ट्रवादीमुळे फलटण, कोरेगावला लाल दिवा मिळाला होता. तर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपद जिल्ह्याच्या वाट्याला मिळाले होते.लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर सगळीच समीकरणे बदलली. आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही काँग्रेस नेते आता आक्रमक झाले आहेत. सुस्त कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लावण्यासाठी नेते त्यांना चार्ज करत आहेत.दहिवडीतील बैठकीत आमदार गोरे यांनी पाच वर्षे केलेल्या विकासकामांचा ऊहापोह केला, तर येथील बैठकीत आमदार शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी नेत्यांनी स्वत: केलेल्या कामांचा पाढा वाचून भाजप-सेनेवर टीकास्त्र सोडले. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांनो कामाला लागा : गोरे
दहिवडी येथे माण तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत आमदार जयकुमार गोरे यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावेत, असे आवाहन केले. ‘विधानसभा निवडणुकीत अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, याची खंत आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून गावोगावच्या विकासासाठी आपण काम केलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे,’ असे ते म्हणाले.
विकासात राजकारण नको : शिंदे
साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात सोमवारी बैठक झाली. त्यावेळी शिंदे यांनी निधी वाटपात आघाडीने राजकारण आणले नव्हते. ते म्हणाले, ‘या अंर्थसंकल्पात भाजप-सेनेने विकासात राजकारण न आणता किमान अडीचशे कोटींची तरतूद करावी.’ आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाजप-सेनेचे अस्तित्वही पाहायला मिळणार नाही,’ असा विश्वास व्यक्त केला.