सर्वाधिक जागा जिंकण्याची ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी’त चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:17 AM2021-02-05T07:17:27+5:302021-02-05T07:17:27+5:30
कोल्हापूर : गतवेळच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतही सर्वाधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला असून, जिंकून ...
कोल्हापूर : गतवेळच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतही सर्वाधिक जागा जिंकण्याचा संकल्प केला असून, जिंकून येणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची रणनीती आखली आहे. ताराराणी आघाडी असो अथवा भाजप असो त्यांच्यातील हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारांना थेट उमेदवारीचे आमंत्रण कॉंग्रेसने दिले आहे. त्यामुळे ही लढत कॉंग्रेस व राष्ट्रवादीत यांच्यातच होणार असे दिसते.
पुढे एक दीड वर्षानी स्थानिक स्वराज संस्थेतून विधान परिषदेवर पाठवायच्या प्रतिनिधीसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत खुद्द पालकमंत्री सतेज पाटील हेच उमेदवार असणार आहेत. ही निवडणूक अधिक सोपी व्हावी म्हणूनच कॉंग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज संस्थेतील आपले संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील कॉंग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ ४० ते ४५ पर्यंत वाढवायचे आहे.
महापालिकेतील संख्याबळ वाढवायचे असेल तर जे निवडून येण्याची शक्यता आहे, त्यांनाच पक्षाची उमेदवारी देऊन त्यांच्या मागे ताकद उभी करण्याची रणनिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आखली आहे. राजकारणात कायमचा कोणी शत्रू नसतो, हेच कॉंग्रेसच्या रणनीतीतून दिसून येत आहे. मंत्री पाटील यांच्याकडून निवडून येण्याची शंभर टक्के खात्री आहे, अशा उमेदवारांना ‘येऊन भेटा’ असे निरोप दिले जात आहेत. त्याला प्रतिसादही मिळत आहे.
पालकमंत्री मंत्री पाटील यांनी भाजपच्या यशोदा मोहिते, गणेश देसाई, ताराराणी आघाडीचे ईश्वर परमार, रिंकू ऊर्फ विजय देसाई यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांना कॉंग्रेसच्या उमेदवारीचे आश्वासन दिले असल्याची चर्चा आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले संभाजी जाधव यांच्या पत्नी सुनंदा जाधव, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या कॉंग्रेसकडून इच्छुक आहेत.
सध्या मालोजीराजे छत्रपती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसमध्ये सक्रिय होत आहेत. त्यामुळे त्यांना मानणारे काही कार्यकर्ते कॉंग्रेसच्या उमेदवारसाठी इत्सुक आहेत. मालोजीराजेंमुळे दिगंबर फराकटे, ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर, पूजा नाईकनवरे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकते.
कोणत्या प्रभागात कोण जिंकू शकतो, हे हेरुन त्यांना पक्षाची उमेदवारी देण्याची कॉंग्रेसची तयार सुरू असून हीच पध्दत राष्ट्रवादीनेही स्वीकारली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीपेक्षा कॉंग्रेसची लढत ही राष्ट्रवादीबरोबरच होईल, असे एकंदरीत चित्र पाहता दिसून येते.