कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांची हायकोर्टात याचिका

By admin | Published: May 7, 2016 01:10 AM2016-05-07T01:10:22+5:302016-05-07T01:11:06+5:30

जात पडताळणी प्रमाणपत्र : एकतर्फी कारवाईस राज्य सरकारला मनाई करण्याची विनंती

Congress-NCP corporators petition in high court | कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांची हायकोर्टात याचिका

कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांची हायकोर्टात याचिका

Next

कोल्हापूर : जात पडताळणी प्रमाणपत्र निर्धारित वेळेत न देणाऱ्या महानगरपालिका सभागृहातील कॉँग्रेसच्या सहा, राष्ट्रवादीच्या चार, तर शिवसेनेच्या एक अशा ११ नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये एकतर्फी कारवाई करण्यास राज्य सरकारला मनाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आरक्षित जागेतून विजयी झालेल्या ३३ नगरसेवकांना जातीच्या दाखल्याची पडताळणी केल्याबाबतचे विभागीय जात पडताळणी समितीचे प्रमाणपत्र निवडणूकझाल्यापासून सहा महिन्यांच्या आत सादर करण्याबाबत सांगण्यात आले होते. ही निर्धारित मुदत ३० एप्रिलला संपली. या मुदतीत केवळ १३ नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्रे महापालिका प्रशासनाकडे सादर केली होती. उर्वरित २० नगरसेवकांना ती मिळाली नाहीत. त्यांच्या अर्जावर जात पडताळणी समितीने निर्णय वेळेत दिला नाही.
दरम्यान, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ज्या २० नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केली नाहीत, त्यांच्याबाबतचा अहवाल राज्य सरकारच्या नगरविकास विभागास पाठवून त्यांच्याविरोधात काय कारवाई करावी, याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. गुरुवारी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करून घेतली. न्या. कर्णिक व न्या. कानडे यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सांगण्यात आले. राज्य सरकार अथवा कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही, म्हणून एकतफर् ी कारवाई केली जाऊ नये, त्याआधी आमचे म्हणणे ऐकून घेतले जावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. विभागीय जात पडताळणी समितीकडून अद्याप कार्यवाही पूर्ण न झाल्यामुळे प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. म्हणून आमचे म्हणणे ऐकूनच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा याचिकेत करण्यात आली आहे. ११ नगरसेवकांच्यावतीने अ‍ॅड. अमित बोरकर काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)


न्यायालयात धाव घेणाऱ्यांत महापौरांचा समावेश
ज्या २० नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केली नाहीत, त्यामध्ये कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचे चार, तर शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. पक्षीय राजकारणातून नगरसेवकपद रद्द केले जाईल, या भीतीपोटी ११ नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, रिना कांबळे, अफजल पिरजादे, हसिना फरास, सचिन पाटील, नियाजखान, आदी नगरसेवकांचा त्यात समावेश आहे.

Web Title: Congress-NCP corporators petition in high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.