काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर रवाना
By admin | Published: March 18, 2017 12:16 AM2017-03-18T00:16:43+5:302017-03-18T00:16:43+5:30
जिल्हा परिषद : उर्वरित सदस्य आज जाणार
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी दोन्ही कॉँग्रेस व ‘भाजता’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणताही पक्ष सदस्यांबाबत जोखीम उचलण्यास तयार नसल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवारी सायंकाळी आपले सदस्य सहलीवर पाठविले.
जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी दोन्ही गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेने अद्याप भूमिका जाहीर न केल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप समोर पेच निर्माण झाला आहे. तोपर्यंत आपल्या सदस्यांमध्ये फूट पडू नये, यासाठी दोन्ही कॉँग्रेसने सावधानता म्हणून सदस्य सहलीवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या नूतन सदस्यांना शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे बोलावण्यात आले. त्यानंतर नऊ सदस्यांना बेळगाव येथे पाठविण्यात आल्याचे समजते. बेळगाव येथून त्यांना गोव्याला हलविण्यात येणार आहे. युवराज पाटील व विजय बोरगे हे सदस्य सहलीवर गेलेले नाहीत. कॉँग्रेसने सायंकाळी कॉँग्रेस कमिटी सदस्यांना एकत्रित केले. त्यानंतर फुलेवाडी येथील पी. एन. पाटील यांच्या गॅरेजवर हलविण्यात आले. कॉँग्रेसच्या १४ पैकी १0 सदस्यांना कोकणात सहलीवर पाठविल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या ‘शाहू पुरस्कार’चे वितरण आज, शनिवारी असल्याने काही विद्यमान सदस्यांचा यामध्ये गौरव होणार आहे. त्यानंतर या सदस्यांना रवाना केले जाणार आहे.
बोरगे अजून शाहूवाडीतच!
शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे विजय बोरगे हे शुक्रवारी सहलीवर गेलेले नाहीत, ते अजून शाहूवाडीतच आहेत. त्यांना शनिवारी किंवा रविवारी सहलीवर पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
हत्तरकी, खमलेट्टी कॉँग्रेससोबत?
‘गोकुळ’चे दिवंगत संचालक राजकुमार हत्तरकी यांच्या पत्नी रेखा हत्तरकी व जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या गटाच्या राणी खमलेट्टी हे गडहिंग्लज तालुक्यातील दोन सदस्य कॉँगेससोबत राहणार असल्याचे समजते.