सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार

By admin | Published: November 3, 2015 12:11 AM2015-11-03T00:11:12+5:302015-11-03T00:35:20+5:30

महापालिकेचे राजकारण : सतेज यांनी घेतली मुश्रीफ यांची भेट; जुन्याच फॉर्र्म्युल्यानुसार पद वाटणी

Congress-NCP will come together for power | सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार

सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार

Next

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी कॉँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. महापालिकेत दोन्ही कॉँग्रेसनी एकत्रित सत्ता स्थापन करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. गत पाच वर्षांप्रमाणे एकत्रित सत्ता स्थापन करून त्याच फॉर्र्म्युल्यानुसार पदांची वाटणी करण्यावर बऱ्यापैकी एकमत झाले आहे.
महापालिका निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे कोणाचा तरी हात हातात घेतल्याशिवाय सत्तेच्या चाव्यांपर्यंत पोहोचता येणार नाही. कॉँग्रेस २७, भाजप-ताराराणी आघाडी ३३, शिवसेना ४, अपक्ष ३ व राष्ट्रवादी कॉँग्रेस १४ असे बलाबल असल्याने येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
राजकारणात काहीही होऊ शकते; त्यामुळे सतेज पाटील यांनी चित्र स्पष्ट झाल्यानंतर लगेचच आमदार हसन मुश्रीफ यांचे नागाळा पार्क येथील निवासस्थान गाठले. दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रा. जयंत पाटील यांची बंद खोलीत चर्चा झाली. तब्बल पाऊण तास या नेत्यांमध्ये निवडणुकीतील यशापयशावर चर्चा झाली.
चर्चा करून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकत्रित सत्तेत यावे, यासाठी सतेज पाटील चर्चेसाठी आले होते.
गेली पाच वर्षे आपण सत्तेत आहोत. कोल्हापूरच्या विकासासाठी ही आघाडी कायम ठेवावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. पाच वर्षे ज्याप्रमाणे पदांची वाटणी झाली, त्याप्रमाणे पुढेही ती कायम ठेवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. कार्यकर्त्यांचीही कॉँग्रेससोबत जाण्याची इच्छा आहे. हा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींसमोर ठेवू. त्यांची काय सूचना येते ते पाहून निर्णय घेतला जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.


महाडिकांना तेवढे बाजूला ठेवा
चर्चा आटोपून हसन मुश्रीफ व सतेज
पाटील खोलीच्या बाहेर येताना
कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्या विजयाच्या घोषणा सुरू केल्या. ‘साहेब, महाडिकांना तेवढे बाजूला ठेवा.’ असे एक कार्यकर्ता ओरडला. यावर त्यासाठीच मुश्रीफसाहेबांकडे आल्याचे सांगत सतेज पाटील तेथून बाहेर पडले.


अनिल कदमांच्या समर्थकांचा
‘स्वीकृत’चा आग्रह
टाकाळा खण-माळी कॉलनी प्रभागातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अश्विनी अनिल कदम यांचा ५० मतांनी पराभव झाला. हा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, निकालानंतर कार्यकर्त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी भेट घेऊन कदम यांना ‘स्वीकृत’ नगरसेवक म्हणून घेण्याचा आग्रह धरला.
प्रामाणिक माणसाचा पराभव झालाच कसा? अशा संतप्त प्रतिक्रिया महिला व्यक्त करीत होत्या. ‘आम्हाला काही सांगू नका. त्यांना महापालिकेत घ्याच.’ असा आग्रह या महिला मुश्रीफ यांच्याकडे धरत होत्या. यावर, ‘बघूया अजून वेळ आहे,’ असे मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Congress-NCP will come together for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.