काँग्रेस-राष्ट्रवादीचा अचूक ‘बाण’
By Admin | Published: February 5, 2016 11:19 PM2016-02-05T23:19:33+5:302016-02-05T23:53:40+5:30
सभापती निवडी : चमत्कारात भाजप नेते पुन्हा नापास; शिवसेनेचे वाघ गैरहजर
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करत ‘चमत्काराची भाषा’ बोलणाऱ्या भाजप-ताराराणी आघाडीला सत्तेपासून रोखले. ‘काहीही करा, पण सभापतिपदाची निवडणूक जिंका’ अशी सूचना करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेच्या वाघांनी घायाळ केले; परंतु कॉँग्रेस आमचा ‘एक नंबर’चा शत्रू असल्याचे सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांना ऐनवेळी सभागृहात गैरहजर ठेवून अप्रत्यक्षपणे काँग्रेसलाच मदत केल्याचे उघड झाले.
काँग्रेस हा आमचा ‘एक नंबर’चा शत्रू असून त्यांना मदत केली जाऊ शकत नाही, असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जाहीर केले होते, त्यामुळे त्यांची मदत ताराराणी-भाजप आघाडीला होऊन निवडणुकीत चुरस भरेल, असे वाटत होते; परंतु शिवसेनेच्या नगरसेवकांना नेत्यांनी आपल्या ताब्यात ठेवत शुक्रवारच्या निवडणुकीसाठी गैरहजर ठेवल्याने त्यातील चुरस संपली आणि राष्ट्रवादीचे मुरलीधर जाधव हे स्थायी समितीचे सभापती, तर लाला भोसले हे परिवहन समितीचे सभापती होण्याचा मार्ग सुकर झाला.
सकाळीच याची कुणकुण लागल्याने ताराराणी-भाजप आघाडीत अस्वस्थता, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे भरते आले होते. (प्रतिनिधी)
वाघांची डरकाळी फुटलीच नाही?
‘आमचे शिवसेनेचे चार वाघ महानगरपालिकेत सर्वांना भारी पडतील’ अशी डरकाळी फोडणाऱ्या नेत्यांनी शिवसेनेचे चारही नगरसेवक शुक्रवारी विविध समिती सभापती निवडणुकीपासून अलिप्त ठेवले, हे वाघ सभागृहात न येता पिंजऱ्यातच बंद राहिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली. शिवसेनेने अलिप्त राहण्याची घेतलेली भूमिका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. शिवसेनेने आपल्यासोबत राहावे यासाठी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती, असे सांगण्यात येते. जर शिवसेनेने भाजप-ताराराणीला मदत केली, तर समान संख्याबळ होऊन चिठ्ठीद्वारे आपले नगरसेवक सभापती होतील, अशी अपेक्षा पालकमंत्री पाटील यांना होती; परंतु शिवसेनेच्या अलिप्त राहण्याच्या निर्णयामुळे ती फोल ठरली.
शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी काँग्रेस हा आमचा प्रमुख विरोध असल्याने त्यांना पाठिंबा देऊ शकत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत राहील अशी अटकळ बांधली जात होती, पण उलटेच घडले. शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले व नियाज खान यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. अरुण दुधवडकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोन दिवस त्या दोघांना मुंबईतच थांबवून घेतले. त्यांना एकट्यांना सोडण्यात आले नाही. शुक्रवारी दुधवडकर यांच्यासोबतच ते कोल्हापुरात आले. तोपर्यंत सभापती निवडीचा कार्यक्रम पूर्ण झाला होता.
‘परिवहन’चे सभापती लाला भोसले
शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे लाला भोसले अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. यावेळी भोसले यांना ७ मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या विजयसिंह खाडे पाटील यांना ५ मते मिळाली. निवडणुकीवेळी शिवसेनेचे नियाज खान हे गैरहजर राहिले, तर स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांचे एक जादा मत लाला भोसले यांना मिळाले.
कदम, सौदागर अपेक्षेप्रमाणे विजयी
महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून काँग्रेसच्या वृषाली कदम, तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादीच्या वहिदा सौदागर यांची निवड झाली. या समितीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे ५, तर भाजप-ताराराणी आघाडीचे ४ नगरसेवक आहेत. अपेक्षेप्रमाणे या दोन्ही निवडी झाल्या.
‘ताराराणी’चे राजसिंह शेळके भाग्यवान
तिन्ही समितींच्या सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर शहरातील चार विभागीय प्रभाग समिती सभापती निवडी पार पडल्या. चारपैकी तीन समिती सभापती हे सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादीचे होणार हे स्पष्ट होते, पण ताराराणी मार्केट विभागीय समितीवर दोन्ही गटांचे १०-१० असे समान बलाबल असल्याने तेथे कोण सभापती होणार याबाबत उत्सुकता होती. या समिती सभापतिपदाची निवडणूक चिठ्ठ्या टाकून घेण्यात आली. त्यामध्ये ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके भाग्यवान ठरले, तर काँग्रेसच्या माधुरी लाड कमनशिबी ठरल्या. शेळके यांच्यारूपाने ताराराणी आघाडीला महानगरपालिकेत एकमेव पद मिळाले.
आमदार पाटील यांच्या प्रयत्नांना यश
कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या मदतीसाठी शिवसेना नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सभागृहात उपस्थित राहणार असाल तर आमच्याबरोबर या किंवा सभेला गैरहजर राहावे, असे दोन पर्याय त्यांनी शिवसेनेला दिले होते. त्यातील दुसरा पर्याय गैरहजर राहण्याचा पर्याय सोयीचा वाटला. त्यामुळे त्यांचा अप्रत्यक्ष फायदा हा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला. दोनपैकी एक पर्याय स्वीकारण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चाही पुढे आली आहे.
शासकीय विश्रामगृहावर चर्चा
शिवसेनेची भूमिका स्पष्ट व्हायला झालेला विलंब, काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या नाराजीमुळे महानगरपालिकेत जाण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते. सर्वांना सूचना देण्यात आल्या, तर आमदार सतेज पाटील यांनी प्रल्हाद चव्हाण यांच्याशी जनता बझारविषयी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली. तत्पूर्वी, आमदार पाटील यांनी प्रल्हाद चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊनही भेट घेतली होती.