कॉँग्रेस-राष्ट्रवादीची रयत आघाडीशी गट्टी

By admin | Published: March 14, 2017 12:02 AM2017-03-14T00:02:48+5:302017-03-14T00:02:48+5:30

शेट्टी, मोहनराव, विशाल पाटील, महाडिक यांच्यात चर्चा

Congress-NCP's Rai Ekvanti Gatti | कॉँग्रेस-राष्ट्रवादीची रयत आघाडीशी गट्टी

कॉँग्रेस-राष्ट्रवादीची रयत आघाडीशी गट्टी

Next

सांगली : रयत विकास आघाडीला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याची खेळी यशस्वी करण्याच्या दिशेने कॉँग्रेस नेत्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राहुल महाडिक यांच्यात बोलणी झाली. याबाबतचा तपशील नेत्यांनी जाहीर केला नसला, तरी रयत आघाडीचा कॉँग्रेसला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या ६० पैकी २५ जागा जिंकून भाजप सत्तेच्या जवळ आहे, तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे दोघांचे मिळून २४ संख्याबळ आहे. रयत विकास आघाडीकडे चार, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस आघाडीकडे एक सदस्य आहे. शिवसेनेचे तीन आणि अजितराव घोरपडे गटाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. निकालानंतर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे ठरवले असून, आघाड्यांच्या मदतीने भाजपला सत्तेपासून दूर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कॉँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि त्यांचे बंधू आ. मोहनराव कदम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून एकत्र येण्याचे ठरवले. नंतर इतरांशी बोलणी सुरू केली. रयत आघाडीच्या नेत्यांसोबत पतंगराव आणि मोहनराव कदम, सत्यजित देशमुख यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. शुक्रवारी माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि मोहनराव कदम यांची बैठक झाली.
सोमवारी खा. शेट्टी, मोहनराव कदम, विशाल पाटील आणि रयत आघाडीचे राहुल महाडिक यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. भाजपच्या सरकारमधील राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना बाजूला करून खा. शेट्टी यांनी यापूर्वीच काँग्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. रयत आघाडीतील महाडिक, नायकवडी आणि सी. बी. पाटील गटाचे मन वळवण्याचेही प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. सोमवारच्या चर्चेनंतर नेमका काय निर्णय झाला, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.
येत्या २१ तारखेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भाजपनेही जोरदार हालचाली केल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकरवी मोर्चेबांधणी केली आहे. सदाभाऊ खोत यांनीही पुढाकार घेतला आहे.

सदाभाऊंना बाजूला करून निर्णय शक्य
सदाभाऊ खोत यांचा कल भाजपच्या दिशेने असला, तरी त्यांचा एकही सदस्य रयत विकास आघाडीत नाही. त्यातच राजू शेट्टी आणि त्यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. रविवारी दोघेही नेते इस्लामपुरात जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात एकत्र होते, मात्र त्यांच्यातील अबोला कायम होता. खा. शेट्टी भाजपच्या विरोधात बोलत आहेत. आघाडीतील इतर नेत्यांवरही शेट्टींच्याच मताचा प्रभाव दिसत आहे. अनेक कार्यकममांत डावलल्याने महाडिक गटाचा खोत यांच्यावर राग आहे. त्यामुळे आता खोत यांना बाजूला करून रयत आघाडीचे नेते निर्णय घेतील, असे सांगितले जाते.

शिवसेनाही दुखावली
आठवड्यापूर्वी भाजपने शिवसेनेशिवाय सत्ता स्थापनेचा दावा करून त्यांना दुखावले. त्यावर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी नाराजी व्यक्त करताच जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सारवासारव केली. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत शंका उपस्थित होत आहे. भाजपपासून दुखावलेल्या नाराजांना जवळ करून कॉँग्रेसने धक्कातंत्राची तयारी केली आहे. चार जागा हातात असलेल्या रयत विकास आघाडीचा पाठिंबा मिळाला, तर संख्याबळाचे उद्दिष्ट गाठण्यास दोन्ही कॉँग्रेसला अडचण राहणार नाही.

Web Title: Congress-NCP's Rai Ekvanti Gatti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.