काँग्रेस-राष्ट्रवादीचा ‘व्हिप’ जारी
By admin | Published: November 15, 2015 12:59 AM2015-11-15T00:59:51+5:302015-11-15T01:05:24+5:30
महापौर निवडणूक : कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीवर; भाजप-ताराराणी आघाडीची आज बैठक
कोल्हापूर : महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेकरिता सभागृहात अपेक्षित असलेले संख्याबळ गाठू शकणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीने महापौर, उपमहापौर आपलाच करण्याचा नाद सोडून दिला असला तरीही खबरदारी घ्यावी म्हणून शनिवारी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ४४ नगरसेवकांना पक्षनेत्यांनी दोन दिवसांच्या सहलीवर नेले आहे. दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीच्या सर्व नगरसेवकांची आज, रविवारी सायंकाळी कोल्हापुरातच एका हॉटेलवर बैठक व स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
उद्या, सोमवारी सकाळी अकरा वाजता होत असलेल्या महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नव्या सभागृहातील पहिले महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे. या विशेष सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी स्वीकारणार आहेत. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकरही उपस्थित राहतील.
गेल्या सभागृहात कॉँग्रेस व राष्ट्रवादीने (संख्याबळ ३१ + २५ = ५६) एकहाती सत्ता सांभाळली होती; परंतु नव्या सभागृहात दोन अपक्षांसह त्यांचे संख्याबळ ४४ पर्यंत खाली आले आहे; तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप व ताराराणी आघाडीने एक अपक्ष व चार शिवसेना नगरसेवकांसह ३७ पर्यंत मजल मारली आहे. सध्याचे संख्याबळाचे आकडे पाहता महापौरपदी अश्विनी रामाणे (कॉँग्रेस), तर उपमहापौरपदी शमा मुल्ला (राष्ट्रवादी) यांची निवड होणार, हे स्पष्टच आहे. तरीही काठावरचे बहुमत असल्याने ही निवडणूक एकतर्फी नक्कीच नाही.
बहुमताने हुलकावणी दिल्यामुळे अस्वस्थ झालेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नव्या सभागृहात भाजप किंवा ताराराणी आघाडीचा महापौर करण्यास राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यापर्यंत धडक मारली; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना भाजपचा महापौर करण्याचा आग्रह सोडून द्यावा लागला. त्यांनी भाजप प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. परंतु त्यांनी महापौर, उपमहापौर पदांची निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवला. भाजपने महापौरपदावरील आग्रह सोडला असला तरी निवडणुकीतील रंगत मात्र कायम राहील.
पालकमंत्र्यांच्या भूमिकेचे कॉँग्रेस, राष्ट्रवादीने स्वागत केले; परंतू भाजपने निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते पुन्हा सतर्क झाले. शनिवारी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४४ नगरसेवकांना सहलीवर नेले. या सर्वांचा दोन दिवस कऱ्हाड येथील एक हॉटेलवर मुक्काम राहणार आहे. आज, रविवारी कोयना जलाशय पाहण्याचा बेत आखण्यात आला आहे. सर्व नगरसेवक उद्या, सोमवारी सकाळी दहा वाजता कॉँग्रेस कमिटीजवळ येतील आणि तेथून ते महानगरपालिकेत साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोहचणार आहेत. भाजप-ताराराराणी आघाडीच्या नगरसेवकांची आज, रविवारी सायंकाळी कोल्हापुरातच एका हॉटेलवर बैठक व त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. तसा निरोप सर्व नगरसेवकांना देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
स्मिता माने व संतोष गायकवाड अर्ज मागे घेणार
महापालिका निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडीची युती होती. त्यामुळे या दोन पक्षांपैकी कुणाला कितीही जागा मिळाल्या तरी महापौरपदाची पहिली संधी भाजपला देण्याचे अगोदरच ठरले होते. त्यानुसार भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार सविता भालकर यांचा अर्ज रिंंगणात असेल व ताराराणी आघाडीच्या उमेदवार स्मिता माने या माघार घेणार आहेत. उपमहापौर ताराराणी आघाडीस देण्याचे ठरले होते त्यामुळे ताराराणी आघाडीचे उमेदवार राजसिंह शेळके यांचा अर्ज रिंगणात असेल; परंतु भाजपच्या संतोष गायकवाड यांचा अर्ज मागे घेतला जाणार असल्याचे भाजप आघाडीचे संयोजक सुनील मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचा आज निर्णय
महापालिकेत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. त्यांचा भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आज, रविवारी होणार आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत भाजपच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यामध्ये भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपला पाठिंबा देते की सभागृहात स्वतंत्र अस्तित्व ठेवते, याबाबतही उत्सुकता आहे.
पक्षाचा व्हिप लागू
कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांनी महापौर व उपमहापौर निवडणुकीत अधिकृत उमेदवारांनाच हात वर करून मतदान करावे म्हणून त्यांच्या नगरसेवकांना शनिवारी व्हिप लागू केला आहे; तर भाजप व ताराराणी आघाडीचा व्हिप रविवारी लागू केला जाणार आहे.
सत्तास्पर्धेतून माघार नाही
भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. त्यामध्ये ताराराणीचा महापौर आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर असा फॉर्म्युला निश्चित केला होता. त्यासंबंधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट चर्चा केली; परंतु स्थानिक नेते तयार नसल्याने राष्ट्रवादी ताराराणी आघाडीस पाठिंबा देऊ शकत नसल्याचे स्वत: अजित पवार यांनी पालकमंत्री पाटील यांना कळविले. असे असले तरी सत्तास्पर्धेतून माघार घेतलेली नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. शनिवारी तशा काही वृत्तपत्रांत (‘लोकमत’ नव्हे) बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
आज स्नेहभोजन
भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ व शिवसेनेचे चार अशा ३७ जणांसाठी या आघाडीने निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आज, रविवारी स्नेहभोजन ठेवले आहे. उद्या, सोमवारी या आघाडीचे नगरसेवक एकत्रित गळ्यात त्या-त्या पक्षांचे स्कार्फ घालून येतील.