काँग्रेसला ‘रिचार्ज’ची गरज
By admin | Published: July 6, 2017 11:53 PM2017-07-06T23:53:58+5:302017-07-06T23:53:58+5:30
सर्जेराव शिंदे यांची कसोटी : शिरोळमधील पक्षाच्या नव्या कार्यकारिणीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष
संदीप बावचे । लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी शिवसेनेच्या मदतीने दोन्ही काँग्रेसने सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत नव्याने नियुक्त झालेले तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांची कसोटी लागली होती. निवडणुकीनंतर शिरोळ तालुक्यात काँग्रेसला ऊर्जितावस्था आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर
पक्षांची कोणतीच पुनर्बांधणी झालेली नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी अनिल यादव यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यादव यांच्यानंतर दानोळीचे सर्जेराव शिंदे यांना तालुकाध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर तालुक्यातील काँग्रेसमध्ये चलबिचलता निर्माण झाली होती. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष शिंदे यांनी
निवडणुकीची धुरा सांभाळली. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या तीन जागा काँग्रेस पक्षाला
मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत शिंदे यांच्या पत्नी सुजाता
शिंदे यांना दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता.
४० वर्षांपासून काँग्रेस एकनिष्ट असलेले तालुकाध्यक्ष शिंदे यांनी दानोळी सरपंच, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य असा अनुभव त्यांच्याकडे आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांची बांधणी, कार्यकर्त्यांना ताकद देणे हे चित्र काँग्रेस पक्षात दिसत नाही. पक्षातील कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.
तालुक्यात काँग्रेसला रिचार्ज करण्यासाठी पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे.
पद काँग्रेसचे झेंडा भाजपचा
फेब्रुवारीमध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळसह तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. यात प्रवेश न केलेले कार्यकर्तेदेखील सहभागी होते. पद काँग्रेसचे आणि हातात झेंडा भाजपचा असेच चित्र दिसून आले होते.
नेत्यांना संधी
आॅक्टोबरमध्ये शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने गटातटातील राजकारण ढवळून निघणार आहे. त्यातच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे रंगत येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांतील नेत्यांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचाराची संधी मिळणार आहे.
शिरोळ तालुक्यात काँग्रेसच्या बांधणीसाठी लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन कार्यकारिणीवर चर्चा होऊन त्याचा निर्णय घेणार आहोत. त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाणार आहे.
- सर्जेराव शिंदे,
तालुकाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस