जिल्ह्यात पुन्हा एकदा कॉंग्रेस सत्तेच्या केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:21+5:302020-12-27T04:17:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेली दोन दशके गटबाजी, कुरघोड्या आणि वर्चस्ववादातून झालेल्या पाडापाडीमुळे जिल्ह्यात अस्तित्वशून्य झालेली कॉंग्रेस हळूहळू ...

The Congress is once again at the center of power in the district | जिल्ह्यात पुन्हा एकदा कॉंग्रेस सत्तेच्या केंद्रस्थानी

जिल्ह्यात पुन्हा एकदा कॉंग्रेस सत्तेच्या केंद्रस्थानी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेली दोन दशके गटबाजी, कुरघोड्या आणि वर्चस्ववादातून झालेल्या पाडापाडीमुळे जिल्ह्यात अस्तित्वशून्य झालेली कॉंग्रेस हळूहळू का होईना पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी येत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत विभागून का असेना, पण कॉंग्रेसचे कार्यकर्ते सत्ता फळे चाखताना दिसत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हातात घेतली आहेत.

सोमवारी (दि.२८) देशभर साजऱ्या होत असलेल्या कॉंग्रेसच्या १३५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील सद्य:स्थितीचा धांडोळा घेतला असता, अजूनही जिल्ह्यात कॉंग्रेसचाच खुट्टा बळकट असल्याचे दिसते. नेते आणि कार्यकर्त्यांमधील संवादाच्या काही मर्यादा, अडचणी यांचा अपवाद वगळला, तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते अजूनही आशावादी आहेत. नेत्यांनी मनावर घेतले तर कार्यकर्ते जिवाचे रान करतात आणि मोदी लाटेत देखील कॉंग्रेसची पताका इथे दिमाखात फडकू शकते, हे कोल्हापुरातील कॉंग्रेसने दाखवून दिले आहे. त्यामुळेच पाच वर्षांपूर्वी एकही आमदार नसल्याची नामुष्की ओढवलेल्या कॉंग्रेसकडे आज शिक्षक, विधानपरिषदेसह कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि हातकणंगले या मतदारसंघाचे आमदार आहेत. जिल्ह्यातील एकूण १२ आमदारांपैकी ६ आमदार हे कॉंग्रेसचे आहेत. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कॉंग्रेसचा आहे. बाजार समिती, महानगरपालिकेत राष्ट्रवादीसोबत आलटूनपालटून सत्ता वाटून घेतली आहे. जिल्हा बॅंकेतही वर्चस्व कायम ठेवले आहे.

एकट्याच्या जिवावर काही करता येत नाही, इतर पक्षांनाही सोबत घेण्याचे शहाणपण आत्मसात करत कॉंग्रेसने सत्तास्थानामध्ये पुन्हा प्रवेश केला. आता कॉंग्रेस ज्या संस्थांमध्ये सत्तेत आहे, त्याच्या आता पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही सत्तास्थाने टिकवण्यासाठी पुन्हा एकदा संघटित नाऱ्याची गरज आहे. महानगरपालिका, जिल्हा बॅंक, गोकुळ, बाजार समितीसह सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. जिल्हा परिषदेची निवडणूकही दीड वर्षावर आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विधानपरिषदेची निवडणूकही अवघ्या १४ महिन्यांवर आली आहे. राज्यातील सत्तेचा उपयोग करून घेत ही सत्तास्थाने कायम टिकवण्याचे आणि पक्षवाढीचे आव्हान आहे.

जिल्ह्यात कॉंग्रेसची स्थापना : १९४८

पहिले अध्यक्ष : रत्नाप्पा कुंभार

आतापर्यंत झालेले जिल्हाध्यक्ष : २१

सत्तेची पदे

राज्यात सध्या इनकमिंग, आऊटगोईंग जोरात सुरू आहे. कोल्हापुरातही राष्ट्रवादीकडे इनकमिंग सुरू आहे. त्या तुलनेत कॉंग्रेस अजून शांत आहे, पण जिल्हाध्यक्ष स्वीकारल्यापासून सतेज पाटील यांचे समझोता आणि आक्रमकपणा यांची सांगड घालत पक्षाला अधिकाधिक सत्तेची पदे मिळावीत, कार्यकर्त्याना संधी मिळावी यासाठी प्रयत्न आहेत. त्याला चांगले यश येताना दिसत आहे.

पालकमंत्री-पीएन यांचे मनोमिलन गरजेचे

पालकमंत्री पाटील व आमदार पी. एन. पाटील हे मनापासून एकत्र आले तर जिल्ह्यात कॉंग्रेसला कोण हरवू शकत नाही, पण सध्या तसे घडत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. सतेज पाटील यांच्याकडेच सर्व जबाबदारी ढकलून बाजूला राहण्याची मानसिकता वाढल्याचे दिसत आहे.

Web Title: The Congress is once again at the center of power in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.