काँग्रेसने एमआयएमचा पाठिंबा नाकारला, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत
By पोपट केशव पवार | Published: April 24, 2024 05:44 PM2024-04-24T17:44:17+5:302024-04-24T17:45:05+5:30
कोल्हापर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला.
कोल्हापूर : कोल्हापूर ही सर्वधर्मभाव जपणारी भूमी असून देशद्रोही, जातीयवादी असलेल्या एमआयएम पक्षाचा पाठिंबा न स्वीकारण्याची काँग्रेसने घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसनेही आम्ही पाठिंबा मागितलाच नव्हता तर तो स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असे पत्रक काढून जाहीर केले. या पार्श्वभूमीवर हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई व सुनील सामंत यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले.
ते म्हणाले, एमआयएम हा देशविरोधी व प्रखर जातीयवादी पक्ष आहे. शाहू छत्रपती यांना पाठिंबा देऊन हा पक्ष सर्वधर्मभाव जपणाऱ्या कोल्हापुरात जातीयवादाची बीजे पेरु पाहत होता. मात्र, आम्ही त्याला वेळीच कडाडून विरोध केला. या पक्षाने देशात, छत्रपती संभाजीनगर येथे दंगली घडवून आणत वातावरण दूषित केले. त्यामुळे असा पक्ष कोल्हापुरात येण्यास आमचा नेहमीच विरोध राहील. त्यांचा डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही. काँग्रेसने वेळीच त्यांचा पाठिंबा नाकारला याचे आम्ही स्वागत करतो. यावेळी उदय भोसले, संदीप सासणे, निरंजन शिंदे,योगेश केळकर उपस्थित होते.