सतेज पाटलांच्या कुरघोड्यांना कॉँग्रेसचे पाठबळ
By admin | Published: October 13, 2015 12:34 AM2015-10-13T00:34:53+5:302015-10-13T00:39:19+5:30
स्वरूप महाडिक : महाडिकांना संपविण्याचा प्रयत्न केल्यानेच ताराराणी आघाडी पुनर्जीवित
कोल्हापूर : राजकारणातील विरोध समजू शकतो; पण व्यक्तिगत पातळीवर उतरून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा आधार घेऊन महाडिक कुटुंबीयांना सातत्याने त्रास दिला. महादेवराव महाडिक यांना जिल्ह्यातून संपवू पाहणाऱ्यांना काँग्रेसश्रेष्ठींनी पाठबळ दिले. अशा काँग्रेसचा महापालिका निवडणुकीत प्रचार कसा करायचा? यातूनच ‘ताराराणी’ पुनर्जीवित केली. याला राज्य व जिल्हा पातळीवरील कॉँग्रेसचे नेतेच जबाबदार असल्याचे शरसंधान ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना विरोधकांवर साधले. महाडिक यांचे नाव वगळून मार्केटमध्ये ‘ताराराणी’ आघाडीचे अस्तित्व शून्य असून, महादेवराव महाडिक यांच्या छत्रछायेखालीच ‘ताराराणी’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वरूप महाडिक म्हणाले, आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वत:च्या व्यवसायातील पैशांतून राजकारण केले. त्यांच्यामुळेच सामान्य माणसाला राजकारणात मानाचे स्थान मिळाले; पण दुर्दैवाने त्यांची नकारात्मक बाजू समाजासमोर आणण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या भूमिकेमागील कारणे तपासण्याची खरी गरज आहे. आमदार महाडिक हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविताना, त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. महाडिक कुटुंबीयांचे फायदे घ्यायचे आणि महाडिक ज्यावेळी अडचणीत असतील, त्यावेळी त्यांच्यावर टीका करणारी प्रवृत्ती जिल्ह्यात वाढली आहे. गत विधानसभा निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा अपमान केला. राजकारणात विरोधाला विरोध समजू शकतो; पण तो व्यक्तिगत पातळीपर्यंत न्यायचा नसतो. तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी आमच्या उद्योगधंद्यांना टार्गेट केले. याबाबत आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कऱ्हाडमध्ये जाऊन गृहराज्यमंत्र्यांना आवरा, अशी विनंती केली होती. परंतु, महाडिक यांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व संपवू पाहणाऱ्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी पाठबळ दिले. मग अशा काँग्रेसचा प्रचार आम्ही कसा करायचा? असा सवाल स्वरूप महाडिक यांनी केला.
आमदार महाडिक हे स्वयंभू नेते आहेत. ताराराणी आघाडीची पुनर्बांधणी करताना त्यांचा सल्ला घेतला. आजपर्यंत आमदार महाडिक यांना संघर्षातूनच सर्व पदे मिळाली आहेत. जिल्हा बॅँक असो किंवा विधानपरिषद निवडणुक प्रत्येकवेळी विरोध करण्यात आला. मागील लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना उमेदवारी देऊ नका म्हणणारे कोण होते? त्यावेळी उमेदवारी दिली असती तर ही वेळ आलीच नसती. जे आज महाडिकांना विरोध करत आहेत, त्यांच्यावर किती उपकार केले हे तरी मागे वळून त्यांनी पाहावे, असेही स्वरूप महाडिक यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सुनील मोदी उपस्थित होते.
सतेज पाटील आमदारही झाले नसते!
आमदार महादेवराव महाडिक यांनी अनेकांना राजकारणात आणून मोठे केले; पण ज्यावेळी महाडिक यांना मदत करण्याची वेळ येते, त्यावेळी अनेकजण उलटले. महाडिक यांनी आशीर्वाद दिला नसता तर सतेज पाटील आमदार झाले नसते, याचे भानही या मंडळींनी ठेवावे, असा इशारा स्वरूप यांनी दिला.