वस्त्रोद्योगासाठी काँग्रेसचे टेक्स्टाईल सेल
By admin | Published: October 4, 2015 11:21 PM2015-10-04T23:21:03+5:302015-10-05T00:09:44+5:30
मुंबईत बैठक : सरकारकडे समस्या मांडण्याची मागणी
इचलकरंजी : राज्यातील वस्त्रोद्योगातील दीर्घकालीन मंदीच्या परिस्थितीमुळे यंत्रमाग उद्योगाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. वस्त्रोद्योगाच्या समस्या केंद्र व राज्य सरकारकडे मांडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश टेक्स्टाईल सेलची निर्मिती केली आहे. मुंबई येथे प्रदेश काँग्रेस समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या वर्षाहूनही अधिक काळ राज्यातील वस्त्रोद्योगात अभूतपूर्व मंदी आहे. परिणामी वस्त्रोद्योगामध्ये आर्थिक टंचाईसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र व राज्यातील सरकारकडे विषय मांडावा, जेणेकरून या उद्योगास ऊर्जितावस्था मिळेल, याबाबतचा विचारविनिमय प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत
झाला. त्यावेळी, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, आमदार आसिफ शेख (मालेगाव), इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, प्रदीप रांका (सोलापूर), सादीक अजिज, मुझफर अहंमद, आदींची टेक्स्टाईल समिती नेमली.टेक्स्टाईल समितीने हा विषय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर मांडावा. तसेच केंद्रातील आमदार व खासदार यांनी राज्य व केंद्र सरकारकडे वस्त्रोद्योगाच्या समस्या मांडाव्यात, असेही ठरल्याची माहिती पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली.