काँग्रेसची आज घोषणा

By admin | Published: December 6, 2015 01:18 AM2015-12-06T01:18:39+5:302015-12-06T01:33:01+5:30

विधानपरिषदेचे रणांगण : सतेज पाटील उद्या अर्ज भरणार

Congress today announced | काँग्रेसची आज घोषणा

काँग्रेसची आज घोषणा

Next

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसश्रेष्ठी जो उमेदवार देईल, त्याच्या मागे सर्वांनी राहावे, असे आदेश शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पी. एन. पाटील, सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांना दिले. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरची जागा निवडून आणायची असल्याने दगाफटका चालणार नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, उमेदवारीची घोषणा आज, रविवारी रात्री होण्याची शक्यता असून सोमवारी (दि. ७)अर्ज दाखल करण्याचे नियोजन इच्छुकांनी केले आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही उमेदवारी सतेज पाटील यांनाच मिळण्याची शक्यता गडद झाली आहे.
दरम्यान कर्नाटकातील उमेदवारीची घोषणा पक्षाने शनिवारी सायंकाळी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील यादी आज रविवारी जाहीर होऊ शकेल असे सुत्रांनी सांगितले. काँग्रेसची उमेदवारी कोणाला, याविषयी जिल्ह्यात उत्सुकता ताणली आहे. उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत पी. एन. पाटील, सतेज पाटील, आमदार महाडिक व आवाडे यांची बैठक गांधीभवन येथे झाली. त्या बैठकीत चव्हाण यांनी सांगितले की,‘ दोन दिवसांपूर्वी आमची राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चा झाली, परंतु त्या बैठकीत आम्ही काही बोलण्यापूर्वीच सर्व चारही उमेदवारांची सगळी माहिती त्यांनीच दिली. कारण प्रत्येकाची ताकद काय व मर्यादा काय आहेत यासंबंधीची ‘फाईल’ त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय तेच घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्हाला तुम्ही चौघेही सारखेच आहात. उमेदवारीचा निर्णय आमच्या हातात नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीच उमेदवारी जाहीर करणार आहेत. उमेदवारी कोणालाही मिळाली, तरी काँग्रेस विरोधात कोणीही जाऊ नका. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरची जागा निवडून आणायची आहे. सांगली-साताऱ्याच्या तुलनेत कोल्हापूरातील काँग्रेस अधिक मजबूत आहे याचे प्रत्यंतर पुन्हा येईल असा प्रयत्न करुया.
सुमारे वीस-पंचवीस मिनिटे एकत्रित चर्चा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी पी. एन. पाटील, आमदार महाडिक, आवाडे व सतेज पाटील यांच्याशी प्रत्येकी दहा-पंधरा मिनिटे स्वतंत्र चर्चा केली. पक्ष देईल त्या उमेदवाराला सहकार्य करण्याची ग्वाही चौघांनीही दिली.
महाडिक यांचे बंडखोरीचे संकेत
या बैठकीनंतर आमदार महाडिक हे लगेच कोल्हापूरला निघून आले. काँग्रेसची उमेदवारी दुसऱ्या कुणालाही मिळाली तरी आपणांस लढावे लागणार असल्याचे महाडिक यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यांना सांगितल्याचे समजते.

Web Title: Congress today announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.