‘काँग्रेस विरुद्ध भाजप’ थेट लढत
By admin | Published: December 7, 2015 12:39 AM2015-12-07T00:39:41+5:302015-12-07T00:42:26+5:30
कोल्हापूरची जागा भाजपला : भाजप-शिवसेनेचे अखेर जमलं, उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारीनंतर ठरणार--विधान परिषद निवडणूक
कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेसाठी भाजप-शिवसेना एकत्र आले असून काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, यावर भाजपचा उमेदवार ठरणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी कोल्हापुरात नामवंतांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये भाजप-शिवसेनाही मागे नाही. मात्र, त्यांच्या राज्यातील जागावाटपामध्ये कोल्हापूरची जागा भाजपच्या पारड्यात पडल्याने ‘काँग्रेस विरुद्ध भाजप’ अशीच सरळ-सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. असे असले तरी पण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीनंतरच भाजपचा उमेदवार ठरणार असल्याने भाजपचा उमेदवार कोण असणार, याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक हे काँग्रेसच्या व्यासपीठावर कधीही दिसले नाहीत, पण त्यांनी पडद्यामागे राहून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ताराराणी आघाडीने भाजपशी महायुती करून काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढविली; पण तोच आरोप आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर आज होत असतानाच त्यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. याशिवाय माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनीही उमेदवारी मागितली आहे; पण या विधान परिषदेसाठी भाजपकडे जिल्ह्णात निवडून येण्याइतपत संख्याबळ नसले तरीही शिवसेना-भाजप या युतीच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा ही भाजपच्या वाट्याला आली आहे. (प्रतिनिधी)
यड्रावकर आज अर्ज भरणार
जिल्हा परिषदेत सत्ता हवी : सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दबावतंत्र
आयुब मुल्ला -- खोची
जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या निमित्ताने काँग्रेसवर दबाव टाकण्याचे तंत्र अवलंबिले आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचा उमेदवारी अर्ज आज, सोमवारी दाखल करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस यड्रावकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेतील सहभागाची शिकार करेल असे वाटते आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे राजेंद्र पाटील यांचेच नाव सुरुवातीपासून आघाडीवर आहे. काँग्रेसकडे मतांची संख्या १२० आहे, तर राष्ट्रवादीकडे ११६ आहे. जनसुराज्य शक्ती व राष्ट्रवादी मित्र पक्ष आहेत. त्यामुळे दोन्हींची मते १४६ इतकी होतात. तरीसुद्धा राज्यपातळीवर असलेल्या राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमुळे कोल्हापूरवर काँग्रेसचा हक्क आहे. असे जरी असले, तरी काँग्रेसअंतर्गत इच्छुक जास्त आहेत. त्यामुळे या पक्षात बंडखोरी अटळ आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची साथ महत्त्वाची आहे. ती पाहिजे असेल तर जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा देण्याची राष्ट्रवादीची मागणी आहे.
ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्याचा विचार जिल्हापातळीवरील काँग्रेस नेत्यांनी न केल्यास प्रदेश पातळीवर दोन्ही अध्यक्षांच्या चर्चेतून मार्ग काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तो निर्णय वरील पातळीवरूनच व्हावा यासाठी राष्ट्रवादी दबावाचे राजकारण करत आहे. राजेंद्र पाटील यांच्याकडे जयसिंगपूर, करुंदवाड नगरपालिकेकडील नगरसेवकांचे संख्याबळ २७ तसेच जिल्हा परिषद सदस्य समर्थक तीन असे तीस संख्याबळ आहे. पक्षातील सर्वार्थाने सक्षम उमेदवार ते आहेत. त्यांचा निर्णय शेवटी उमेदवारीमध्ये झालाच तर काँग्रेसला प्रचंड संघर्ष करावा लागेल. याचाच फायदा राष्ट्रवादी उचलण्याच्या तयारीत आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यड्रावकरांची भेट घेतल्याने त्यांचे महत्त्व आणखीच वाढले आहे.
यड्रावकर गटाच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यांनी विधान परिषदेसाठी उभे राहावे यासाठी आग्रह धरला आहे. गेल्या दोन वेळी त्यांनी तयारी केली होती, परंतु पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. यावेळी त्यांना त्याग करावा लागेल अशी स्थिती आहे; पण ती जिल्हा परिषदेचा निर्णय राष्ट्रवादीसारखा होण्यावर अवलंबून आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी सुरू आहेत.
काँग्रेसची कोल्हापूरची उमेदवारी आज (सोमवारी) जाहीर होणार आहे.
काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार महादेवराव महाडिक, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील तसेच माजी आमदार प्रकाश आवाडे यांनीही उमेदवारी मागितली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील (यड्रावकर) हेही आपला उमेदवारी अर्ज आज, सोमवारी दाखल करणार आहेत.
राजेंद्र पाटील (यड्रावकर) विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करणार आहेत.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथे होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास ते जाणार आहेत.
त्यानंतर नागपूर येथे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यासंदर्भात अधिवेशनाच्या काळात दि. १० रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करतील.
त्यानंतर तटकरे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करावयास लावतील आणि या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून समजते.
उमेदवार कोण : सत्यजित कदम यांचे नाव
काँग्रेसची कोल्हापूरची उमेदवारी आज (सोमवारी) जाहीर होणार आहे.
त्यामुळे ही उमेदवारी कोणाला मिळणार यावरच भाजपचा उमेदवार ठरणार, हे मात्र निश्चित आहे.
कदाचित भाजपच्यावतीने नगरसेवक सत्यजित कदम यांचीही उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.