काँग्रेस करणार विकास कामांचे मार्केटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 11:00 PM2017-03-10T23:00:37+5:302017-03-10T23:00:37+5:30
महापालिकेत नगरसेवकांची बैठक : निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
सांगली : महापालिकेच्या गत सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसह आतापर्यंत केलेल्या विकास कामांचे मार्केटिंग करण्याचा निर्णय शुक्रवारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी प्रभागनिहाय समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे महापौर हारूण शिकलगार व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढीलवर्षी जुलैमध्ये होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने आतापासून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शुक्रवारी महापौर शिकलगार व शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत गटनेते किशोर जामदार यांच्या कार्यालयात काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत गत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये जनतेला दिलेल्या विविध आश्वासनांचा आढावा घेण्यात आला. जाहीरनाम्यातील ७० टक्के आश्वासने काँग्रेसने पूर्ण केली आहे. उर्वरित ३० टक्के आश्वासनाच्या पूर्ततेसाठी सव्वा वर्षात प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.
महापौर हारूण शिकलगार म्हणाले, महापालिका क्षेत्रातील रस्ते खराब झाले आहेत. त्यासाठी २४ कोटींची निविदा काढली आहे. या कामांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. शहरात स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी माळबंगला येथील ५६ व ७० एमएलडी जलशुध्दीकरण केंद्र तातडीने कार्यान्वित होणार आहे. एप्रिलपर्यंत शुद्ध पाणीपुरवठा होईल. शिवाय मिरज पाणीपुरवठा योजनेची निविदा अंतिम टप्प्यात आहे, असे स्पष्ट केले.
शहरातील खुल्या जागा सुशोभिकरण करण्याचा आढावा घेण्यात आला. पार्किंग, चौक सुशोभिकरण, स्वच्छतागृहे आदींबाबत चर्चा झाली. ज्या घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणची घरे झोपडपट्टी धारकांना द्यावीत, अशा सूचना नगरसेवकांनी दिल्या. धोत्रेआबा झोपडपट्टी धारकांना १५ एप्रिलला घरकुले देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवाय नगरसेवकांच्या विकास कामांच्या असणाऱ्या अडचणी त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगाव्यात, पदाधिकाऱ्यांनी ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले. महापौरांनी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात आवश्यक त्या कामांचा समावेश करून ही कामे सव्वा वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केले.
भाजपने महापालिकेची निवडणूक ताकदीने लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र काँग्रेस पक्ष कोठेही कमी पडणार नाही. नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचे मार्केटिंग करण्यासाठी डिजिटल फलक उभे करावेत व प्रभागनिहाय समित्या स्थापन करण्याच्या सूचना शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिल्या.
या बैठकीला माजी महापौर विवेक कांबळे, कांचन कांबळे, नगरसेवक राजेश नाईक, सुरेश आवटी, प्रदीप पाटील, बसवेश्वर सातपुते, पांडुरंग भिसे, गजानन मगदूम, अनारकली कुरणे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपला शह देण्याची तयारी
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच जिल्ह्यात नंबर एकवर राहिला आहे. जिल्हा परिषदेत आजवर खातेही नसताना मिळालेल्या यशानंतर पुढीलवर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली असून वर्षभरापूर्वीपासूनच तयारी चालविली आहे. गेल्या महिन्याभरात सत्ताधारी काँग्रेसने रस्ते, गटारींसह नगरसेवकांच्या प्रभागातील ३५ कोटीची कामे मंजूर केली आहेत.
उपमहापौर गटाची गैरहजेरी
काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीकडे उपमहापौर गटाने पाठ फिरविली. या गटातील अनारकली कुरणे व गजानन मगदूम वगळता इतर नगरसेवक गैरहजर होते. उपमहापौर विजय घाडगे महापालिकेत असतानाही ते बैठकीकडे गेले नाहीत. याबाबत विचारता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या बैठकीबाबत आम्हाला कोणताही निरोप आला नव्हता. पक्षाची बैठक काही नगरसेवकांना घेऊन केली आहे. त्यामुळे आमच्या गटातील नगरसेवक बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचा खुलासा त्यांनी केला.