महाडिक यांना वगळून काँग्रेस लढणार

By admin | Published: September 23, 2015 12:14 AM2015-09-23T00:14:31+5:302015-09-23T00:16:33+5:30

पतंगराव कदम यांची घोषणा : महापालिका निवडणुकीसाठी साठ उमेदवारांची यादी तयार; बैठकीत शिक्कामोर्तब

Congress will fight except Mahadik | महाडिक यांना वगळून काँग्रेस लढणार

महाडिक यांना वगळून काँग्रेस लढणार

Next

कोल्हापूर : प्रत्येक निवडणुकीवेळी पक्षात राहून दगाबाजी होत असल्याचा अनुभव लक्षात घेता यावेळी आमदार महादेवराव महाडिक यांना वगळून महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यास काँग्रेस पक्ष सक्षम आहे, तसा निर्णय झाला आहे. पक्षच एवढा मोठा आहे की त्यामुळे कोणी पक्षासोबत असले आणि नसले तर काँग्रेसला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी महाडिक यांना फटकारले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी निश्चित करण्याकरीता मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीत माजी मंत्री पतंगराव कदम, सतेज पाटील, रमेश बागवे, पक्ष निरीक्षक सत्यजित देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे उपस्थित होत्या. बैठकीनंतर पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कदम म्हणाले, ‘ आमदार महाडिक यांचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांना वगळून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविषयी बैठकीत घासून-पुसून चर्चा झाली. अप्रत्यक्ष विरोध करणार असतील तर त्यांना सोबत घेण्यात अर्थ नाही; यावर आमचे एकमत झाले. त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा संबंध राहिलेला नाही. त्यांना सोबत घेतले नाही म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांवर काही परिणाम होणार नाही. महाडिक सध्या काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी जर विरोधाची भूमिका घेतलीच तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’ (प्रतिनिधी)


‘महाडिक’ विषय संपला
महाडिक पक्षासोबत असल्याचे सांगतात आणि नेमकी उलटी भूमिका घेतात. त्याचा त्रास उमेदवारांना व पक्षालाही झाला. त्यामुळे त्यांना वगळूनच महापालिकेची निवडणूक लढविणार आहोत. आमच्यादृष्टीने महाडिकांचा विषय आता संपलेला आहे. महाडिक यांच्यावर कारवाई करण्यास पक्ष नेतृत्व हतबल नाही. योग्य वेळी कारवाई करेल.



उमेदवारांची यादी तयार
काँग्रेस पक्षाने सर्व ८१ प्रभागांतून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. मंगळवारच्या पहिल्या बैठकीत ६० प्रभागांतील उमेदवारांची नावे निश्चित केली. येत्या दोन-चार दिवसांत ती जाहीर करु. पक्षात आता गट-तट राहिले नसून सर्व नेते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. त्यामुळे पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचेल, असे कदम यांनी सांगितले.

एकदा होऊन जाऊ दे
विधान परिषदेचे उमेदवार म्हणून महादेवराव महाडिक यांचे नाव असेल का, अशी विचारणा करता कदम म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक लागल्यावर त्या गोष्टीवर चर्चा होईल. महाडिक असतील की नसतील यापेक्षा काँग्रेसचा उमेदवार असेल एवढे नक्की आहे.


प्रचारात विकासाचा मुद्दा
मनपाच्या निवडणुकीत आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. शहरात केलेली विकासाची कामे आणि पुढील काळात काय करणार आहोत याचा अजेंडा आम्ही मतदारांसमोर ठेवणार आहोत, असे सतेज पाटील यांनी सांगितले. प्रचाराचा एकत्रित शुभारंभ आणि सांगता समारंभ मोठ्या स्वरूपात असेल तर प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभा घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Congress will fight except Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.