काँग्रेसचा फैसला सोमवारीच शक्य
By admin | Published: December 3, 2015 01:09 AM2015-12-03T01:09:33+5:302015-12-03T01:14:47+5:30
विधानपरिषद निवडणूक : भाजपची भूमिका नंतर ठरणार
कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषद मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा फैसला सोमवारी सकाळीच जाहीर होण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली. काँग्रेसचा उमेदवार कोण, यावर आमच्या पक्षाची रणनीती अवलंबून असेल. आमदार महादेराव महाडिक यांनाच जर काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर आमचा काही रोलच राहत नाही, असे भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासाठी दिल्लीस गेलेले आमदार महादेवराव महाडिक बहुधा आज, गुरुवारी कोल्हापुरात येत आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे अजूनही दिल्लीतच तळ ठोकून बसले आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे मुंबईतच आहेत. हे चौघेही आपल्यालाच उमेदवारी मिळणार यावर ठाम असल्याने ती नक्की कुणाला मिळणार याबद्दल लोकांतही प्रचंड उत्कंठा लागून राहिली आहे.
काँग्रेसची उमेदवारी मिळणे म्हणजे निवडणुकीतील पन्नास टक्के यश मिळण्यासारखेच असल्याने त्या उमेदवारीसाठी प्रथमच एवढी चुरस झाली आहे.कोल्हापूरच्या राजकारणात काँग्रेसमध्ये विधानसभेसाठीही अलीकडील काही वर्षांत एवढी चुरस कधी झालेली नाही; परंतु या उमेदवारीस महत्त्व असल्यानेच ती मिळविण्यासाठी टोकाची इर्ष्या पेटली आहे. पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या रविवारी रात्री उशिरा अमेरिकेहून परतणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आज, बुधवारी नागपूरमध्ये होते. ते रात्री दिल्लीस जाणार आहेत. शनिवारी उमेदवारी जाहीर झाल्यास दुसऱ्या दिवशी सुटी आहे. त्यामुळे त्याऐवजी रविवारी रात्री अथवा सोमवारी सकाळीच काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा दिल्लीहून होण्याची शक्यता ठळक झाली आहे.
आमदार महाडिक यांना तुमची उमेदवारी घट्ट झाली का, अशी विचारणा केली असता ते हसले व म्हणाले,‘घट्ट-पातळ अजून काही मला समजलेले नाही. राज्य व दिल्लीतील पक्षांच्या नेत्यांना भेटायचे होते ते भेटून आलो. आता पक्ष काय निर्णय घेतो त्यावर पुढील दिशा ठरवू.’
राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेची या मतदारसंघात मर्यादित ताकद आहे; परंतु भाजपने पालकमंत्री पाटील यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे म्हणून त्यांना विचारणा केली असता पालकमंत्री म्हणाले,‘काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळते याची आम्ही वाट पाहत आहोत. ती जर महाडिक यांना मिळाली तर मग आमचा काही रोलच राहत नाही. ती अन्य कुणाला मिळाली तर काय करायचे याचा निर्णय घेऊ.’