Kolhapur lok sabha result: छत्रपतींनाच मान, धैर्यशील यांचा विजयी बाण
By विश्वास पाटील | Published: June 5, 2024 12:06 PM2024-06-05T12:06:53+5:302024-06-05T12:07:31+5:30
कोल्हापुरात फिफ्टी फिफ्टी यश, सव्वीस वर्षांनंतर काँग्रेसला गुलाल
विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती हे १ लाख ५४ हजार ९६४ मतांनी विजयी झाले. तब्बल २६ वर्षांनंतर काँग्रेसला या मतदारसंघात गुलाल लागला. शेवटच्या फेरीपर्यंत हृदयाचा ठोका चुकवायला लावलेल्या हातकणंगले मतदारसंघातून शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी १३ हजार ३९९ मतांनी विजयश्री खेचून आणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या, किंबहुना त्यांच्यामुळेच हा विजय साकारला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. कोल्हापुरात महाविकास आघाडी व महायुतीला फिफ्टी-फिफ्टी यश मिळाले.
कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना ७ लाख ५४ हजार ५२२ मते मिळाली. शिंदेसेनेचे मावळते खासदार संजय मंडलिक यांना ५ लाख ९९ हजार ५५८ मते मिळाली. या मतदारसंघात तब्बल २३ उमेदवार रिंगणात होते. नोटा मतांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर राहिली. हातकणंगलेमध्ये खासदार माने यांना ५ लाख २० हजार १९० मते मिळाली. उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांना ५ लाख ६ हजार ७९१ तर शेट्टी यांना १ लाख ७९ हजार ८५० मते मिळाली. वंचितच्या डी. सी. पाटील यांनीही ३२ हजार ६९६ मते घेतली. या मतदारसंघात तब्बल २७ उमेदवार रिंगणात होते. वंचितच्या उमेदवाराने गेल्या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सत्यजित पाटील यांनाही वंचितचा फटका बसला.
पाच मतदारसंघात छत्रपतींना मताधिक्य
- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच खासदार मंडलिक यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण होते. त्यांनी गद्दारी केल्याचाही राग लोकांत होता. परंतु तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी ताकद पणाला लावून उमेदवारी मिळवून दिली. या मतदारसंघात महायुतीकडे मातब्बर नेत्यांची फौज होती.
- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह तीन आमदार, भाजपचे खासदार धनंजय महाडिक असे बळ होते. त्यामुळे त्या ताकदीच्या बळावर मंडलिक विजयी होतील, असा महायुतीचा होरा होता. परंतु तो पुरता चुकला.
- सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांनी शाहू छत्रपती यांना चांगले मताधिक्य दिले. खुद्द कागल विधानसभा मतदारसंघातही मंडलिक यांना कसेबसे १३ हजार ८५८ मताधिक्य मिळाले. त्यामुळे पहिल्या फेरीपासूनच मंडलिक मागे राहिले.
सोळाव्या फेरीनंतर धैर्यशील यांना आघाडी
हातकणंगले मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या बारा फेरीपर्यंत उद्धवसेनेचे सत्यजित पाटील आघाडीवर होते. सोळाव्या फेरीनंतर हळूहळू धैर्यशील माने पुढे सरकले. त्यानंतरही मताधिक्य वर-खाली होत गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल झाली. परंतु अखेर विजयश्री माने यांनीच खेचून आणली. माने यांच्या उमेदवारीबद्दलही सुरुवातीला नाराजी होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात त्यांचा स्वत:चा मतदारसंघ असल्याप्रमाणे ताकद पणाला लावली. आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील यड्रावकर या नेत्यांना सगळी रसद पुरवून मतदारसंघाची जणू नाकाबंदीच केली. त्या तुलनेत सत्यजित पाटील यांची संघटनात्मक ताकद कमी पडली. गेल्यावळेलाही माने यांना इचलकरंजीने विजय मिळवून दिला होता. या निवडणुकीतही इचलकरंजीनेच त्यांना तब्बल ३८ हजारांवर मताधिक्य दिले. त्या तुलनेत सत्यजित पाटील यांना त्यांच्या हक्काच्या शाहूवाडी, वाळवा, इस्लामपूर मतदारसंघांनी पुरेशी ताकद दिली नाही.
प्रचारातील वातावरण सत्यजित पाटील पुढे राहतील व दुसऱ्या क्रमांकासाठी धैर्यशील माने व शेट्टी यांच्यात लढत होईल, असे होते. प्रत्यक्षात शेट्टी मतांच्या पातळीवर फारच खाली राहिले. मोदी हवेत की नकोत, या लढाईत शेतकरीही माझ्यासोबत राहिला नसल्याची प्रतिक्रिया शेट्टी यांनी पराभवानंतर व्यक्त केली.
काय ठरले निर्णायक
कोल्हापुरात महायुतीच्या मतांच्या बेरजा कागदावरच, लोकांनी नेत्यांचे अजिबातच ऐकले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधलेली मोट शाहू छत्रपती यांना विजयापर्यंत घेऊन गेली.
हातकणंगलेत मोदी फॅक्टर, विनय कोरे ठरले किंगमेकर. मतांचे धुव्रीकरण, महायुतीच्या नेत्यांची एकजूट आणि मुख्यमंत्र्यांनी लावलेली ताकद माने यांना गुलाल देऊन गेली.