कॉँग्रेसची ‘स्वाभिमानी’, ‘जनसुराज्य’शी चर्चा सुरू
By admin | Published: January 25, 2017 12:50 AM2017-01-25T00:50:59+5:302017-01-25T00:50:59+5:30
भाजप-शिवसेना सोडून सर्व पर्याय खुले : पी. एन. पाटील, सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर : ज्या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे तेथे त्यांच्याशी व पन्हाळा तालुक्यांत ‘जनसुराज्य’शी आघाडी करण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिवसभर बाराही तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप आणि शिवसेना सोडून कुणाशीही आघाडी करण्याबाबत प्रदेशकडून परवानगी मिळाली असल्याने तशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पी. एन. म्हणाले, जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’सोबत आम्ही पाच वर्षे सत्तेत होतो. आताही जेथे ‘स्वाभिमानी’ची ताकद आहे, तेथे त्यांच्यासोबत आघाडी करण्याची भूमिका आहे. त्यानुसार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे पन्हाळा तालुक्यातही ‘जनसुराज्य’सोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. जनता दलाशीही चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेनेला सोडून जे समविचारी आहेत त्यांंच्याशी चर्चा करून आघाडी करण्याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहेत.
कागल तालुक्यात अडचण असल्याचे मान्य करत पी. एन. यांनी प्रवीणसिंह पाटील काँग्रेसचे काम करणार असल्याबाबत कार्यकर्त्यांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. अजून आमच्याशी चर्चा झालेली नाही, असे सांगितले. या निवडणुकीसाठी मोठा उत्साह दिसत असून ६७ पैकी ५० जागांपेक्षा अधिक जागांवर काँग्रेस लढेल, असे ते म्हणाले.
प्रकाश आवाडे, डॉ. सुजित मिणचेकर व राजू शेट्टी यांची बैठक झाल्याची विचारणा केल्यानंतर या दोघांनीही आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. सतेज पाटील म्हणाले, आवाडे आणि आवळे यांनी सामंजस्याने चर्चा करून जागावाटप करून एकत्र निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा आहे. ‘भुदरगड’मध्ये बजरंग देसाई, दिनकरराव जाधव एकत्र येत आहेत. आंबेडकरी पक्ष एकत्र येऊन दोन्ही काँग्रेसकडून अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आहेत याबाबत विचारले असता अशा संघटना, पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
हाताच्या चिन्हावरच निवडणूक
राष्ट्रवादीने आघाड्यांसाठी घड्याळ चिन्ह न वापरता आघाडीचे चिन्ह वापरण्याबाबत मुभा दिल्याबाबत विचारले असता काँग्रेसचे उमेदवार हे केवळ हाताच्या चिन्हावरच लढतील, असे पी. एन. यांनी स्पष्ट केले. ज्यांच्याबरोबर आघाडी असेल त्यांनी त्यांचे चिन्ह घ्यावे पण काँग्रेसचे उमेदवार दुसरे कुठलेही चिन्ह घेणार नाहीत.
निश्चित उमेदवारांची यादी २८ पर्यंत करणार जाहीर
महाराष्ट्र प्रदेशने ३१ जानेवारीला उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सांगितले आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये एकाच प्रबळ उमेदवाराने उमेदवारी मागितली आहे. नेसरीमध्ये विद्याधर गुरबे, उत्तूरमध्ये उमेश आपटे यांच्या मतदारसंघात केवळ त्यांनीच उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे प्रदेशची परवानगी घेऊन २८ जानेवारीपर्यंतही पहिली यादी जाहीर करू, असे सतेज पाटील यांनी सांगितले. कोळिंदे्र येथून अंजना रेडेकर यांचेही नाव निश्चित मानले जाते.
चंदगडमध्ये नरसिंगराव गट, भरमू अण्णांसोबत ओमसाई आघाडी
चंदगडमध्ये नरसिंगराव पाटील गट, भरमू अण्णा पाटील गट आणि संभाजी देसाई यांनी ओमसाई आघाडी एकत्रित निवडणूक लढवेल, असे यावेळी सांगण्यात आले.
भाजपची ताकद नसल्याने इनकमिंगची गरज
भाजपने आयात केलेल्यांना वगळून लढून, जिंकून दाखवावे. ‘...बिंदू चौकात सत्कार करू,’ या विधानाबाबत सतेज पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, हे वास्तव आहे. भाजप जिल्ह्णात ताकदीने कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कॉँग्रेससारख्या मजबूत पक्षाला गरज नाही, तर भाजपला इनकमिंगची गरज आहे.
एकत्र फिरलात तर ५0 जागा
तुम्ही दोघं (पी. एन. आणि सतेज) एकत्र फिरलात तर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या ५0 जागा निवडून येतील अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असे सांगितल्यानंतर पी. एन. आणि सतेज दोघंही खळखळून हसायला लागले. कार्यकर्त्यांची नेमकी भावना त्यांना समजल्याने त्यांचा हा प्रतिसाद होता. ५० जागा येणार असतील तर नुसते फिरायलाच कशाला, आम्ही दोघेही रथात बसून फिरतो, असे पी. एन. म्हटल्यानंतर कॉँग्रेस कमिटीत हशा उसळला.
आमचं बरं चाललंय,
तो विषय काढू नका
महादेवराव महाडिक हे अजूनही आपण काँग्रेसमध्येच असल्याचे सांगतात. याबाबत विचारणा केली असता सतेज पाटील यांनी ‘तो विषय आता इथे काढू नका. आमचं (पी. एन -सतेज)बरं चाललंय. आता त्यात आणि दुसरा विषय नको, काही बोलायला लावू नका,’ अशी विनंती केली. महापालिकेतील निधीच्या श्रेयाबाबत विचारले असता त्यासाठी पाठपुरावाही आवश्यक असतो, असे ते म्हणाले.