शिवसेनेची ‘जशास-तशी’ जोडणी

By admin | Published: February 6, 2017 01:05 AM2017-02-06T01:05:56+5:302017-02-06T01:05:56+5:30

जिल्हा परिषद रणांगण : युती तुटल्यानंतर आक्रमक; ५८ जागांवर धनुष्यबाण

Conjunction of Shiv Sena's 'Jasash-Tashi' | शिवसेनेची ‘जशास-तशी’ जोडणी

शिवसेनेची ‘जशास-तशी’ जोडणी

Next

समीर देशपांडे, कोल्हापूर : एकीकडे जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून भाजता आघाडी धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे शिवसेनेनेही गाजावाजा न करता ‘जशास तशी जोडणी’ लावली आहे. ६७ पैकी ५८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. अशातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर तर शिवसेनेने आपल्या हालचाली आणखी आक्रमक केल्या आहेत.
शिवसेनेचे जिल्ह्यात ग्रामीण भागात पाच आमदार आहेत. तीन जिल्हाप्रमुखांकडे जिल्हा विभागून देण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याकडे आजरा, गडहिंग्लज, चंदगड, कागल, राधानगरी व भुदरगड असे सहा तालुके आहेत. या तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या २६ जागा आहेत. मात्र, या सर्व तालुक्यांत शिवसेनेने अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार देत ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले आहे. भाजपपेक्षाही ग्रामीण भागात शिवसैनिकांची संख्या मोठी आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती संग्रामसिंह कुपेकर, आजरा पंचायत समितीचे विद्यमान सभापती विष्णूपंत केसरकर, माजी अध्यक्ष संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक, माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती भरमाण्णा गावडा, विद्यमान सदस्य अर्जुन आबिटकर यांच्या पत्नी, शिवसेना नेते संजय घाटगे यांचे चिरंजीव ‘गोकुळ’चे संचालक अमरिशसिंह घाटगे ही शिवसेनेच्या उमेदवारांची काही वजनदार नावे आहेत.
आजऱ्यात दणका
आजरा साखर कारखान्यातील महाआघाडीतून विद्यमान सभापती विष्णुपंत केसरकर यांना सोबत घेऊन आजऱ्यात ताराराणी आघाडीला दणका देणाऱ्या शिवसेनेने आजऱ्याचे माजी सरपंच जितू टोपले यांच्याकडे आजऱ्यातून उमेदवारी घेण्यासाठी आग्रह धरल्याचे वृत्त आहे.
सलाईन लावून जाधवांची जोडणी
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हे तर रोज तीनवेळा सलाईन लावून घेऊन निवडणुकीच्या जोडण्या लावत आहेत. जाधव यांच्या छातीत पाणी झाले आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी रोज सलाईन लावण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जाधव हे सकाळी, दुपारी व संध्याकाळी सलाईन लावून घेत आहेत.


 

Web Title: Conjunction of Shiv Sena's 'Jasash-Tashi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.