आजरा कारखान्यासाठी आतापासूनच जोडण्या
By Admin | Published: January 21, 2016 11:18 PM2016-01-21T23:18:21+5:302016-01-22T00:52:00+5:30
तीन पॅनेलची शक्यता : अशोकअण्णांची फिल्डिंग; विरोधक निवांतच
ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखान्याची निवडणूक मे २0१७ च्या दरम्यान होत असली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी यांनी सुरुवातीपासूनच सावध पण नेटकी फिल्ंिडग लावण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीला सामोरे जायचे त्याकरिता आतापासूनच कामाला लागा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. एकीकडे अशोकअण्णांनी नेटकी फिल्डिंग लावल्यानंतरही विरोधक मात्र निवांतच दिसत आहेत.
निवडणुकीत ज्या घडामोडी होतील त्या होतील, परंतु सद्य:स्थितीला अशोकअण्णा हे सत्तेचे प्रबळ दावेदार दिसत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात प्रत्येक निवडणुकीत अशोकअण्णा उजवे ठरले आहेत. अंतर्गत दगाबाजीने तालुका संघाच्या निवडणुकीत सत्तेपासून दूर जावे लागले असले, तरी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची कारखाना निवडणुकीत व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.
स्वबळावर लढण्याची तयारी ठेवणारे चराटी जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढचे पाऊल टाकतील, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे विरोधक मात्र अंतर्गत खेळ्या करून आपल्याच पदरात जास्तीत जास्त कशा जागा पडतील याकरिता प्रयत्नशील दिसत आहेत. मुळात कारखाना निवडणुकीत तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांपुढे तीन पर्याय राहणार आहेत. एकाने डावलल्यास दुसरा मार्ग खुला राहणार आहे; परंतु त्यातल्या त्यात प्रबळ पर्याय म्हणजे अशोकअण्णांची आघाडी व त्यांच्या विरोधातील मुख्य आघाडी असाच आहे. सुरुवातीलाच ‘गोकुळ’चे रवींद्र आपटे यांच्यासह काही संचालक व संघटनांनी त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
विरोधी मंडळी एकत्र येणार
आमदार प्रकाश आबिटकर, रवींद्र आपटे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह प्रमुख मंडळींची रसद अशोकअण्णांना राहणार आहे. अशोकअण्णांची सुरू असलेली तयारी, अशोकअण्णांच्या विरोधातील मंडळींच्या एकत्र येण्यात असणाऱ्या राजकीय अडचणी, यांवर लक्ष ठेवून असणारे काही प्रमुख नेते प्रसंग पडल्यास तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाता येईल का, याची चाचपणी करू लागले आहेत. एकंदर कारखाना निवडणूक घडामोडींमध्ये कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात अशोकअण्णा आघाडीवर दिसत आहेत.