‘कनेक्टिव्हिटी’ वाढविणार
By admin | Published: March 5, 2015 12:14 AM2015-03-05T00:14:05+5:302015-03-05T00:14:19+5:30
अशोक भोईटे : ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रे, व्याख्याने समाजासाठी उपयुक्त ठरणारी असतात. मात्र, विद्यापीठात ती होत असल्याने ती अधिकतर लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ती लक्षात घेऊन चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यक्रम शहरात घेण्याचे नियोजन आहे. त्याद्वारे विद्यापीठाची कोल्हापूरकरांशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी येथे बुधवारी सांगितले.
‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला त्यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. शिवाय त्यांनी विद्यापीठाच्या नव्या उपक्रमांबाबत संवाद साधला. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य बातमीदार विश्वास पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, वरिष्ठ लघुलेखक प्रशांत झंपले उपस्थित होते.
डॉ. भोईटे म्हणाले, विद्यापीठातील कार्यक्रम हे शैक्षणिक असतात, असा अनेकांचा समज झाला आहे. मात्र, विविध विद्याशाखांद्वारे होणारी चर्चासत्रे, परिषदा, व्याख्याने यांचे विषय समाजाशी संबंधित असतात; पण हे कार्यक्रम विद्यापीठात होत असल्याने ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ते लक्षात घेऊन समाजासाठी उपयुक्त असलेले कार्यक्रम कोल्हापूर शहरातील राजर्षी शाहू स्मारक भवन, करवीर नगर वाचन मंदिर, आदी ठिकाणी घेण्याचे नियोजन आहे. त्यातून शहरवासीयांशी विद्यापीठ जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच एकांकिका, नाटके विद्यापीठात घेतली जातील. विद्यापीठातील संशोधन, विविध उपक्रम समाजासाठी कसे उपयुक्त ठरतील, हे लक्षात घेऊन त्यांचे नियोजन केले जाईल.
‘लोकमत’चे पाठबळ
विद्यापीठातील अनेक उपक्रम राज्यात पोहोचवून आम्हाला बळ देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. शिवाय त्रुटी दाखवून विद्यापीठाला जागेदेखील केले असल्याचे डॉ. भोईटे यांनी सांगितले. ते म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकांसाठी ‘लोकमत’ राबवीत असलेले विविध उपक्रम उल्लेखनीय आहेत. विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीसाठी ‘लोकमत’ने पाठबळ द्यावे.