आर्थिक विवंचनेचा परिणाम; नव्या शैक्षणिक धोरणाची गरज, युनेस्कोने व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:52 PM2020-05-24T23:52:17+5:302020-05-24T23:53:01+5:30
कोरोनामुळे मुलींचे शिक्षण होणार ‘लॉकडाऊन’
- संतोष मोरबाळे
कोल्हापूर : कोरोना या महामारीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला रोजगार, नोकरी गमवावी लागली आहे. याचा थेट परिणाम मुलींच्या शिक्षणावर होणार असल्याची भीती ‘युनेस्को’ने व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनपूर्वी युनिसेफ आणि सेंटर फॉर बजेट पॉलिसी स्टडीज यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे ४० टक्के मुली अद्यापही शिक्षणापासून दूर आहेत. यातील ३० टक्के मुलींनी कधी शाळेत पायही टाकलेला नाही. लॉकडाऊननंतर ही स्थिती अजूनही गंभीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मजुरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींवरच त्यांचे सध्या लक्ष आहे. अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणाकडे कितपत लक्ष दिले जाईल, याबाबत शंकाच आहे.
शहरात काम नसलेले मजूर आपल्या गावी जात आहेत. गावी गेल्यानंतर त्यांच्यासमोर कोणत्या समस्या असतील याचीही त्यांना अद्याप कल्पना आलेली नाही. तेथे गेल्यानंतर सावकाराकडून कर्ज काढल्याशिवाय घरातील चूलही पेटणार नाही अशी बहुतांश मजुरांची स्थिती आहे. अशा गरीब मजुरांच्या मुलींच्या शिक्षणाची दारे कोविड-१९ मुळे बंद होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच सरकारने नवे शैक्षणिक धोरण ठरविणे गरजेचे आहे.
दहावीपर्यंचे मुलींचे शिक्षण मोफत असले तरी लॉकडाऊननंतर शाळा सुरू होतील तेव्हा मुलींवर घरातील कामांची जबाबदारी असणार आहे. आता शिकून काय होणार म्हणून मुलींसाठी शिक्षणाची दारे बंद होऊ शकतात. मुलगी ही जबाबदारी असल्याने तिचे कमी वयातच लग्नही लावून दिले जाण्याची शक्यता आहे. दिव्यांग मुलींच्या अडचणी यापेक्षा वेगळ्या आणि गंभीर आहेत.
लॉकडाऊनमुळे देशातील नव्हे, तर जगभरातील शाळा बंद केल्या आहेत. राज्यात ४००० पेक्षा अधिक शाळा बंद होणार अशी चर्चा होत आहे. या शाळांतील मुलांनी काय करायचे? यामुळेच आॅनलाइन शिक्षणावर भर न देता मुलींना शालेय प्रवाहात आणण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागणार आहे.
१.भारतात अद्यापही मुलींसाठी सहज शिक्षण उपलब्ध होत नाही. मुलींचे शाळागळतीचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. कोणतीही आपत्ती आली तर मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो.
२.अनेक मुलींनी पाणी आणण्यासाठी टँकरवर नंबर लावणे किंवा दुसरीकडून पाणी आणणे यासाठी शाळा सोडल्या आहेत.
३.लॉकडाऊननंतर अनेक मुली शाळेत परत येणार नाहीत. पालक जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी कमी वयातच मुलीचे लग्न लावून देण्याची शक्यता आहे.