राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 08:17 PM2021-02-11T20:17:48+5:302021-02-11T20:18:57+5:30
Sambhaji Raje Chhatrapati Fort kolhapur- राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना करीत असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. मेन राजाराम हायस्कूल येथे त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या दुर्ग परिषदेत ते बोलत होते.
कोल्हापूर : राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी फोर्ट फेडरेशनची स्थापना करीत असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी केली. मेन राजाराम हायस्कूल येथे त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दुसऱ्या दुर्ग परिषदेत ते बोलत होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणून राज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ल्यांचे संवर्धन करायचे आहे. त्याकरिता एक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यातील संबंधितांशी बोलणे झाले आहे. हे काम मोठे आहे. त्याकरिता दुर्ग संवर्धन करणाऱ्या राज्यातील २२७ हून अधिक संघटनांना एकत्रित करण्यासाठी दुर्ग फेडरेशनची स्थापना केली आहे.
केंद्र सरकारच्या या विभागाशी सामंजस्य करार करून हे काम केले जाणार आहे. यात राज्य शासनाच्या सांस्कृतिक, पर्यटन, वन आदी विभागांशी समन्वय साधून ही फेडरेशन काम करेल. त्याचे सदस्यत्व राज्यातील गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या २२७ संस्थांना देत आहोत. हे काम करीत असताना एकाच छताखाली या संस्था येणे गरजेचे होते.
यानिमित्त लवकर रायगड प्राधिकरणाच्या सदस्यांचीही बैठक घेतली जाईल. वाढदिवसानिमित्त राज्यातील २२७ संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित आले, ही बाब निश्चितच भूषणावह आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संरक्षण कसे होईल, याकरिता ही मंडळी एकत्रित येऊन विचारविनिमय करीत आहेत.
तत्पूर्वी इतिहासकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, गडकिल्ले अभ्यासक सर्जेराव भामरे, वरुण भामरे, राम खुर्दळ, राम यादव, सचिन पाटील यांनी परिषदेत मार्गदर्शन केले. ठराव वाचन राम यादव व सुखदेव गिरी यांनी केले. धनंजय जाधव यांनी आभार मानले.