आजऱ्यातील भाताच्या देशी वाणांचे संवर्धन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:17+5:302021-01-25T04:26:17+5:30
सदाशिव मोरे। आजरा : आजरा तालुक्यातून लोप पावत चाललेल्या घनसाळ, काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ, हावळा या भाताच्या देशी वाणांच्या ...
सदाशिव मोरे।
आजरा : आजरा तालुक्यातून लोप पावत चाललेल्या घनसाळ, काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ, हावळा या भाताच्या देशी वाणांच्या संवर्धनाची गरज आहे. उत्पादित होणाऱ्या देशी भातांमध्ये भेसळही होत असल्यामुळे ग्राहक अन्य भाताकडे वळू लागला आहे. भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन झाल्यास चांगला दर मिळेल. आजऱ्याच्या तांदळाला चांगला स्वाद, चव आहे; पण त्याच्या संवर्धनाची सध्या गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून भाताच्या संवर्धनासाठी आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ, कृषी विभाग व जि. प.च्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आजऱ्याच्या घनसाळला जी. आय. मानांकन मिळाले. घनसाळबरोबर आजऱ्याचा काळाजिरगा, चंपाकाळी, कोतमीर साळ हे तांदूळही चांगल्या पद्धतीचे उत्पादित होते. चिरमुरे व पोहेसाठी लागणारा हावळा भात तालुक्यातील उत्तूर परिसरात उत्पादित होतो. चिरमुऱ्याची चव तर जगात भारी अशीच आहे. मुंबई, बंगलोरपाठोपाठ आजऱ्याचा चिरमुरा आता परदेशातही जात आहे. घनसाळबरोबर अन्य जातीच्या भातांचे संवर्धन करण्याची गरज आहे. घनसाळला चांगला दर मिळाला म्हणून त्यामध्ये भेसळ करून विकणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. सध्या सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असला तरी त्यालाही प्रोत्साहन दिल्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही. सध्या घनसाळची उत्पादकता वाढवून तो परदेशात पाठविला जाणार आहे. त्याबरोबर अन्य भाताच्या जातींचे संवर्धन झाल्यास चांगला दर मिळेल.
देशी वाणाच्या संवर्धनासाठी अनुदानाची गरज
सध्या वाढलेले खतांचे दर, मजुरीचे दर, जनावरांऐवजी यांत्रिकीकरणाचा होणारा वापर यामुळे शेती करणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक तरुण शेतीऐवजी रोजगारासाठी शहराकडे आकर्षित होतात. भाताचे देशी वाण टिकवायचे असेल, त्याचे संवर्धन करायचे असेल तर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे.
आजऱ्याच्या चिरमुऱ्याला सर्वत्र मागणी
तालुक्यातील उत्तूर परिसरात पिकला जाणारा हावळ भात चिरमुऱ्यासाठी उपयुक्त आहे; पण सुगीच्यावेळी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडते. उत्पन्नापेक्षा खर्च जादा होतो; पण चिरमुऱ्याला असणारी चव व स्वाद चांगला असल्याने गोव्याला जाणारे पर्यटक आजऱ्यात थांबून या चिरमुऱ्याचा आस्वाद घेतात.