स्क्रीनिंग व्यवस्था वाढविण्याचा विचार_-- सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 06:52 PM2020-04-22T18:52:04+5:302020-04-22T18:57:53+5:30
एक कुटुंबप्रमुख जशी घरातील सगळ्यांची काळजी घेतो, तसेच काम पालकमंत्री पाटील यांच्याकडून सध्या सुरू आहे.
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : कोरोना संशयित व्यक्तीची तपासणी होऊन जेवढे लवकर लक्षात येईल तेवढा त्याच्यापासून होणारा संसर्ग व वाढणारी रुग्णसंख्या रोखता येईल, म्हणून अशा व्यक्तींचे स्क्रीनिंग कसे लवकरात लवकर होईल असे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातही तातडीने स्वतंत्र नियोजन करीत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रश्न : स्थिती कशी आहे?
मंत्री पाटील : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे; परंतु धोका कायम आहे. आपण पुरेशी दक्षता घेणे आवश्यक आहे. सध्या तरी आमचा भर त्यावरच आहे.
प्रश्न : संसर्ग रोखण्यावर भर देण्यासाठी काय करता येईल?
मंत्री पाटील : सध्या तरी आम्ही त्यावरच जास्त विचार करीत आहोत; कारण आता पॉझिटिव्ह म्हणून आलेला एक रुग्ण २१ व्या दिवशी तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी अशा संशयित रुग्णांचे स्क्रीनिंग कसे लवकर होईल याची व्यवस्था करण्यावर आता भर दिला जाणार आहे. त्याशिवाय सीपीआरमध्ये येऊन स्राव देण्याची लोकांना भीती वाटते. म्हणून त्याऐवजी महापालिकेच्या रुग्णालयाच्या माध्यमातून असा स्राव घेण्याची शहरात व जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही व्यवस्था करता येईल का, असा विचार करीत आहोत. तसे झाले तर लवकर स्राव जातील.
प्रश्न : लॉकडाऊन वाढविल्याने लोकांत अस्वस्थता आहे?
मंत्री पाटील : केंद्र व राज्य सरकारकडे प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णांची माहिती रोज जात आहे. आतापर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन होता म्हणून अन्य देशांच्या तुलनेत आपण हा संसर्ग रोखण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविला आहे.
‘पालक’मंत्री म्हणून भूमिका
पालकमंत्री पाटील हे १५ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या संकटकाळात ते यंत्रणा हलवण्याचे काम उत्तम पद्धतीने करीत आहेत. एक कुटुंबप्रमुख जशी घरातील सगळ्यांची काळजी घेतो, तसेच काम पालकमंत्री पाटील यांच्याकडून सध्या सुरू आहे.
मंत्री मुश्रीफ यांच्याशी समन्वय
राज्यात जसे मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे स्थिती हाताळत आहेत, तसेच काम जिल्ह्यात पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याशी त्यांचा उत्तम समन्वय आहे. या संकटाला सामोरे जाताना त्यामुळेच सुलभ होत आहे.