प्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसीला देण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:44 AM2020-12-23T10:44:29+5:302020-12-23T10:47:07+5:30
Muncipal Corporation WaterNews Kolhapur- कोल्हापूर शहरातील जयंती, दुधाळी यांसह अन्य नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर वापरायोग्य पाणी नजीकच्या औद्योगिक वसाहतींना देण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोल्हापूर : शहरातील जयंती, दुधाळी यांसह अन्य नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर वापरायोग्य पाणी नजीकच्या औद्योगिक वसाहतींना देण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोल्हापूर शहरात निर्माण होणाऱ्या ९० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता कसबा बावडा येथे ७६ कोटी खर्चाचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. परंतु, हे प्रक्रिया झालेले पाणी तसेच नदीत सोडण्यात येत आहे. त्याचा योग्य वापर झाल्यास अनेकांची गरज भागणार आहे.
शेतकऱ्यांना विचारणा केली, पण त्यांना आवश्यक आहे तेवढेच पाणी घेत आहेत. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना पाणी दिले तर त्यांना उपयोगी होणार आहे. म्हणून प्रशासक बलकवडे यांनी तशी बोलणी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी सुरू केली आहे. जर निर्णय झाला तर पाईपालाईन टाकून, तसेच टाकी उभारून हे पाणी देणे शक्य आहे.
शहरातील सर्व नाले आता अडविण्यात आले असून, नदीत सांडपाणी मिसळत नाही. जयंती नाल्यावरील पंप दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणी दोन पंप जादा राखीव ठेवण्यात आले आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले.
- ग्रामपंचायतींना महापालिकेच्या नोटिसा -
शहरालगतच्या ग्रामपंचायतींना महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु त्या संबंधित ग्रामपंचायतींची पाण्याची मोठी थकबाकी आहे. ती भरली जात नाही तरीही त्यांना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे थकबाकी भरा, अन्यथा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा देणाऱ्या नोटिसा ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले.