बांधकाम व्यावसायिकांना दिलासा : परिख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:37+5:302021-01-08T05:13:37+5:30
कोल्हापूर : बांधकामासाठी भराव्या लागणाऱ्या प्रीमियममध्ये शासनाने पन्नास टक्के इतकी भरघोस सूट जाहीर केली. मुळातच बांधकाम परवाना ...
कोल्हापूर : बांधकामासाठी भराव्या लागणाऱ्या प्रीमियममध्ये शासनाने पन्नास टक्के इतकी भरघोस सूट जाहीर केली. मुळातच बांधकाम परवाना घेतेवेळी मोठ्या प्रमाणात प्रीमियम भरावे लागत होते. सन २०२१ या एक वर्षाच्या कालावधीसाठी जाहीर केलेल्या या सवलतीमुळे बांधकाम व्यवसायिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे व निश्चितच बांधकाम व्यवसायाला चांगली चालना मिळेल, असे प्रतिक्रिया क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्ष राजीव परिख व मानद सचिव सुनील कोतवाल व्यक्त केली.
क्रेडाई महाराष्ट्र या राज्यव्यापी बांधकाम व्यावसायिकांची संघटना राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे नमूद करून पत्रकात म्हटले आहे की, प्रीमियम सवलतीचा फायदा सर्वसामान्य घर घेणाऱ्या ग्राहकांना मिळावा या हेतूने शासनाने अशा सूट घेतलेल्या प्रकल्पांतील ग्राहकांना लागणारे मुद्रांक शुल्क यापुढे बांधकाम व्यावसायिकांनी भरावयाची अट सुनिश्चित केली आहे. ग्राहकाभिमुख झालेल्या अशा निर्णयाचे सर्वसामान्यांमध्ये देखील स्वागत होत आहे.
यापूर्वी शासनाने सप्टेंबर महिन्यामध्ये मुद्रांक शुल्कमध्ये तीन टक्के सवलत दिली होती त्याचाही फायदा घर घेणाऱ्या ग्राहकांना व्यापक प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे तदनंतर या प्रीमियममधील सवलतीचा फायदा देखील ग्राहकांना निश्चित मिळेल, असेही पत्रकात परिख यांनी म्हटले आहे.