नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान, आमदार विनय कोरेंकडून नेत्यांचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 11:26 AM2022-01-21T11:26:20+5:302022-01-21T11:26:50+5:30

मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी मांडत त्यांनी नेत्यांचा पंचनामाच केल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

Conspiracy of leaders against hasan mushrif says MLA Vinay Kore | नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान, आमदार विनय कोरेंकडून नेत्यांचा पंचनामा

नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान, आमदार विनय कोरेंकडून नेत्यांचा पंचनामा

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निकालानंतर अस्वस्थ असणाऱ्या आमदार विनय कोरे यांनी गुरुवारी सत्तारूढ आघाडीच्या बैठकीत खदखद व्यक्त केली. मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी मांडत त्यांनी नेत्यांचा पंचनामाच केल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचे तीन उमेदवार पराभूत झाले. त्यातही बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा विजयी व आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव विनय काेरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच निकालानंतर योग्य वेळी पापाची परतफेड करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या नाराजीचे पडसाद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर दिसत होते. गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपूर्वी शासकीय विश्रामगृहात झालेल्या सत्तारूढ गटाच्या बैठकीत कोरे यांनी नेत्यांचा चांगलाच पंचनामा केला.

मंत्री हसन मुश्रीफ हे सकाळी साडेदहा वाजताच विश्रामगृहात दाखल झाले होते. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, ए. वाय. पाटील यांच्यासह संचालक दाखल झाले. विनय काेरे व विजयसिंह माने हे दुपारी १२ वाजता तिथे आले. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. तब्बल सव्वा तास चर्चेत कोरे यांनी तालुकानिहाय आकडेवारी मांडत धारेवर धरले.

शेतकऱ्यांची बँक असल्याने राजकारण विरहित असावी, म्हणून बिनविरोधसाठी प्रयत्न केले. ठीक आहे, निवडणूक लागली जर तुम्हाला आमचे उमेदवार मान्य नव्हते तर त्यावेळी सांगायला हवे होते. नंतर फसवाफसवी कशाला करता, तुमच्यासारख्या उंचीवर काम करणाऱ्यांकडून हे अपेक्षित नव्हते. अशा स्पष्ट शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि बैठकीतून बाहेर गेले.

नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान

- सत्तारुढ आघाडीतील नेत्यांचे हसन मुश्रीफ यांच्याविरोधातच कटकारस्थान सुरू होते, असा गंभीर आरोप कोरे यांनी केल्याचे समजते.

- तुमच्या सारख्यामुळे नेत्यांच्या विश्वासार्हतेला तडा जातो, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

नुसते ‘प्रक्रिया’ गटातच मते फुटली का?

- विनय कोरे यांनी ‘पतसंस्था’ व ‘प्रक्रिया’ गटातील मतांवर बोट ठेवल्यानंतर, नुसते या दोन गटातच मते फुटली का?

- इतर गटातील फुटलेल्या मतांचाही पंचनामा का होत नाही? झालेले झाले, येथून पुढे एकसंधपणे पुढे जाण्याचे धाेरण घेऊया, असे एका नेत्याने सांगितले.

Web Title: Conspiracy of leaders against hasan mushrif says MLA Vinay Kore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.