जनता बेघर राहावी हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र
By admin | Published: July 1, 2017 01:06 AM2017-07-01T01:06:19+5:302017-07-01T01:06:19+5:30
जनता बेघर राहावी हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कागलमध्ये एका घरात चार-चार कुटुंबे राहतात. धाडसाने १००२ घरांची घरकुल योजना शहरात राबविली. ही आमदार मुश्रीफ यांनी चूक केली काय? आठ लाखांचे घर पन्नास हजारांत जर मिळत असेल तर समरजित घाटगे तुमच्या पोटात का दुखतंय? कागलची जनता गरीब, बेघर राहावी, हे समरजित घाटगेंचे षड्यंत्र आहे, अशी टीका जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने यांनी केली.
घरकुल योजनेबद्दल भाजप, मित्र पक्षांनी गुरुवारी काढलेल्या मोर्चाचा निषेध म्हणून शुक्रवारी काँग्रेस पक्ष - मित्र आघाडी यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तेव्हा भैया माने बोलत होते.
भैया माने म्हणाले की, तुम्ही ‘म्हाडा’चे अध्यक्ष आहात. आम्ही जागा देतो. तुम्ही घरकुलाच्या किमतीत घर बांधून दाखवा; पण गोरगरिबाची चेष्टा थांबवा. शाहूंचे वारसदार म्हणता आणि जातीयवादी बोलता? शाहू दूध संघातील भ्रष्टाचाराबद्दल उत्तर द्या. कागलच्या युवकांची, गरिबांची बदनामी थांबवा अन्यथा राजा विरुद्ध प्रजा हा नवा संघर्ष सुरू होईल. घरकुलाच्या कोणत्याही चौकशीला आम्ही तयार आहोत.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, अजित कांबळे, पक्षप्रतोद प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, आदींची भाषणे झाली. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अशोक जकाते, नगरसेवक - नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. मोर्चात घरकुल लाभार्थींची मोठी गर्दी होती. शहर अध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले.
...तर राजीनामा : प्रवीण काळबर
समरजित घाटगेंनी निपाणी-संकेश्वरमधील मुस्लिमांना घरे दिली आणि कागलच्या गरीब मुसलमानांना वंचित ठेवले, असा धादांत खोटा आरोप केला आहे. १००२ लोकांच्या यादीत निपाणी, संकेश्वर, मिरज येथील एक जरी नाव असेल तर सिद्ध करा, नगरसेवकपदाचा राजीनामा देतो. शाहूंच्या विचारांचे वारस असणाऱ्या मुश्रीफसाहेबांची
राजकारणासाठी बदनामी करू नका, असे पक्षप्रतोद काळबर यांनी सांगितले.
सिंह, गिधाडे, गाढव
आणि अस्वल, शेळी
गुरुवारी घाटगे यांनी सिंहाची मिरवणूक गिधाडे, गाढव काढू शकत नाहीत, अशी टीका केली होती. प्रकाश गाडेकर यांनी, तुम्ही सिंह नाही शेळी आहात. वाघाच्या जबड्यात हात घालू नका असे सांगितले. शाहू दूध संघाचा तोटा शाहू साखर कारखान्यातून भरून काढून मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, असा आरोपही करण्यात आला.