‘महांकाली’ गिळंकृत करण्याचे कारस्थान

By Admin | Published: September 15, 2014 11:51 PM2014-09-15T23:51:02+5:302014-09-15T23:56:35+5:30

संजयकाका पाटील, घोरपडे : विजय सगरे यांच्यावर टीकास्त्र

Conspiracy to swallow 'Mahankali' | ‘महांकाली’ गिळंकृत करण्याचे कारस्थान

‘महांकाली’ गिळंकृत करण्याचे कारस्थान

googlenewsNext

कवठेमहांकाळ : महांकाली साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलने फोडला. या पॅनेलचे प्रमुख नेते खा. संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, शिवसेनेचे जयसिंगराव शेंडगे यांनी नारळ फुटताच पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पॅनेल व ‘महांकाली’चे अध्यक्ष विजयराव सगरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. आम्हाला अपप्रवृत्तीचे म्हणणाऱ्यांनी कारखाना गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे, तो सभासदांनी मोडून काढावा. तसेच नानासाहेब सगरे क्रेडिट सोसायटी व महांकाली बाजार मोडून खाणाऱ्यांनी तालुक्याच्या विकासाची भाषा करु नये, अशी जोरदार टीकाही या पॅनेलच्या प्रमुख नेत्यांनी सगरे यांच्यावर केली.
आज सकाळी साडेअकरा वाजता महांकालीच्या मंदिरात राजारामबापू शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार व सभासद, काका, सरकार आणि जयसिंगराव शेंडगे यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषद घेऊन या तिघाही नेत्यांनी सगरे यांच्यावर टीका केली.
यावेळी घोरपडे म्हणाले, आम्ही ‘महांकाली’ची निवडणूक लावली म्हणून खोटा प्रचार करणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करु नये. ही निवडणूक विद्यमान संचालक मंडळाच्या साक्षीने अध्यक्ष विजयराव सगरे यांनी मुदतीआधीच पाच महिने लावून घेतली आहे. याचे कारण काय? असा सवालही घोरपडे यांनी यावेळी केला. तसेच कारखान्यामध्ये गेली तीन वर्षे उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात काटामारी केली जातेय व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते आहे. वजन-काटे चालविणारे सुद्धा मॅनेज केले जात आहेत. आपण गेली अनेक वर्षे या कारखान्याला व सत्ताधाऱ्यांना सहकार्य करीत आलो आहोत. परंतु इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांवरील, सभासदांवरील, कामगारांवरील, वाहतूकदारांवरील अन्याय अजिबात सहन करुन घेणार नाही. सगरे यांनी हा कारखाना कशासाठी मल्टिस्टेट केला, याचे उत्तर द्यावे. आमच्यावर बिनबुडाचे आरोप सगरे यांनी करु नयेत.
विद्यमान संचालक मंडळ हे सत्ताधाऱ्यांच्या व सगरेंच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे कारखान्याच्या कारभारात काय चालते हे संचालकांना कळूसुद्धा दिले जात नाही. कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठीच सगरेंनी लादलेल्या ‘महांकाली’च्या निवडणुकीत आम्ही पॅनेल उतरवले आहे, असेही घोरपडे यावेळी
म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे नेते जयसिंगराव शेंडगे यांनीही सगरेंचा व ‘महांकाली’च्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. शेंडगे म्हणाले की, नानासाहेब सगरे यांनी कारखाना चालवताना दहा कोटी रुपये शिल्लक ठेवले होते. त्याचे काय झाले? ही शिल्लक रक्कम कुठे गेली? नानासाहेबांनी चालवलेला चांगला कारखाना मोडीत काढण्याचे व कर्जबाजारी करण्याचे काम अध्यक्ष विजयराव सगरे यांनी केले. कारखान्यावर चोवीस कोटींचा कर्जाचा बोजा केला. सहकारामध्ये कुणी स्वाहाकार करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही.
यावेळी खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, महांकाली कारखाना ही सहकारी संस्था आहे. कुणाची जहागीर नाही. हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यात जर शेतकऱ्यांची लूट होत असेल, तर शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने उभारणे व त्यांना न्याय मिळवून देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे आणि महांकाली कारखान्यात सुरू असलेला अंदाधुंद कारभार थांबविण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. कारखान्यात सुरू असणाऱ्या गैरकारभाराला अंकुश लावण्यासाठी धडपड सुरू आहे. मृत सभासदांच्या वारसदारांना सभासद करुन घेतले जात नाही. उसाची बिले वेळेवर काढली जात नाहीत. कामगारांवर दबाव ठेवला जातो. परंतु हे इथून पुढच्या काळात चालू देणार नाही, असा इशाराही खा. पाटील यांनी सगरेंना दिला.
यावेळी दयानंद सगरे, मिलिंद कोरे, अनिल लोंढे, अझम मकानदार, ओंकार पाटील, बंटी भोसले, सुनील माळी, रंगराव शिंदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

विरोधकांकडून आरोपांच्या फैरी
सगरे क्रेडिट सोसायटी, महांकाली बझारमध्ये गैरव्यवहार
सगरे यांनी हा कारखाना मल्टिस्टेट करण्याचे कारण नव्हते
दहा कोटींची शिल्लक रकमेच्या हिशेबच दिलेला नाही
संचालक मंडळ हे सत्ताधाऱ्यांच्या व सगरेंच्या हातातील बाहुले आहे
गेली तीन वर्षे उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात काटामारी
कारखान्यावर चोवीस कोटींच्या कर्जाचा बोजा
उसाची बिले लवकर न देता आर्थिक पिळवणूक
मुदतपूर्व निवडणूक लादली

Web Title: Conspiracy to swallow 'Mahankali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.