‘शक्तिपीठ’बाबत जनतेला फसविण्याचे षडयंत्र, आमदार सतेज पाटील यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 15:38 IST2024-10-24T15:38:21+5:302024-10-24T15:38:48+5:30
उत्तरचा चेहरा मुलाखतीतीलच

‘शक्तिपीठ’बाबत जनतेला फसविण्याचे षडयंत्र, आमदार सतेज पाटील यांची टीका
कोल्हापूर : वर्ध्यापासून गोव्यापर्यंतचा संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, अशी आमची मागणी आहे, तो केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता रद्द होऊ शकत नाही. तरीही, तो रद्द झाल्याचे सांगून काही जणांकडून कोल्हापूरच्या जनतेला फसविण्याचे षडयंत्र रचले जात आहे, अशी टीका विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
महायुतीकडून शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा अध्यादेश १५ ऑक्टोबर रोजी काढला असेल, तर तो आज का जाहीर केला जात आहे. लोकांना फसविण्याचे निर्णय आचारसंहिता काळात घेतले जातात का? सरकारचे सचिव मागील तारखेचे अध्यादेश काढत आहेत का? हे तपासायला हवे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरताच शक्तिपीठ महामार्ग कसा रद्द होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित करून महायुती सरकारचे हे थोतांड आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मते मिळविण्यासाठी तो केलेला प्रयत्न आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, नेते एकत्रितपणे कसे काम करतील, यासाठी आपला आग्रह आणि प्रयत्न असणार आहे. प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करायचा आहे. त्यामुळे कोणाला पाडण्याऐवजी महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
उत्तरचा चेहरा मुलाखतीतीलच
महाविकास आघाडीतील जागा वाटप बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळपर्यंत पूर्ण होईल, अजूनही काही जागांवर चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णय आज-उद्या निश्चित केले जातील, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तरचा चेहरा हा मुलाखती दिलेल्यांपैकीच असेल, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.