मंत्री मुश्रीफांच्या नावाचा वापर करून २० लाखांची फसवणूक; तपासणीची मागणी करत, मुश्रीफ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 03:31 PM2024-08-17T15:31:11+5:302024-08-17T15:31:33+5:30
दादांची, ती चूक आहे काय
कोल्हापूर : पुण्यात आपल्या नावाचा वापर करून सेवानिवृत्त शिक्षिकेची २० लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी माझ्या बदनामीचे षडयंत्र आणि वस्तुस्थिती या दोन्हीही बाजूंनी तपास झालाच पाहिजे, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजस्थानमधील उषा मुरलीधर व्यास नावाच्या एक सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांना बनावट पोलिस निरीक्षक नरेंद्र गुप्ता या नावाने फोन करून हसन मुश्रीफ हे आमच्या ताब्यात आहेत, असे सांगितले जाते. हे प्रकरण तर अतिशय गंभीरच आहे. यापूर्वीसुद्धा समरजीत घाटगे यांच्या पत्नींचे २० लाख रुपये रक्कम अशा प्रकारेच गेले आहेत. हा २० लाख रुपयांचा योगायोग काय आहे, हेच मला अजून समजत नाही.
या सेवानिवृत्त शिक्षिका व्यास यांचा आमच्याशी दुरान्वयेसुद्धा संबंध नाही. ओळखीच्याही नाहीत, तर मग आपला संबंध नसतानाही लोक पैसे देतातच कसे? अशा गुन्हेगारीचा निपात झाला पाहिजे. सायबर विभागाचे पोलिस काय करतात? आरोपी फोन नंबर दुसऱ्यांचे किंवा बदलून वापरत असतील, हा विषय मी समजू शकतो. परंतु; आरटीजीएसद्वारे पैसे वर्ग होतात, त्या बँक खात्यावरून आरोपी सापडत कसे नाहीत?
रेमंड’च्या मालकाला अटक करा
रेमंड कंपनीमध्ये दहा वर्षांहून अधिक काम करणाऱ्या शंभर कामगारांना कायम करा, अशी मागणी आहे. ती मागणी असताना कंपनीने त्यांची सेवा समाप्त करण्यासाठी पैसे भरले आहेत. ही फार मोठी चूक केली आहे. पोलिसांनी कंपनीच्या मालकालाच तातडीने अटक करून कारवाई करावी लागेल.
दादांची, ती चूक आहे काय
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विराेधात सुनेत्रा पवार यांना लोकसभेला उभे केले, ही आपली चूक होती, अशी प्राजंळ कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. झालेली चूक प्राजंळपणाने कबूल करणे, ही काय चूक आहे काय? असा सवाल मंत्री मुश्रीफ यांनी केला.