कॉन्स्टेबलने केला पत्नीचा खून
By admin | Published: June 26, 2014 12:41 AM2014-06-26T00:41:19+5:302014-06-26T00:42:07+5:30
विमा रक्कम हडपण्यासाठी अपघाताचा बनाव : गोरंबेजवळच्या खुनास महिन्याने फुटली वाचा
कोल्हापूर/ मुरगूड : मूल होत नाही तसेच विम्याचे दोन कोटी रुपये पदरात पाडण्यासाठी मुरगूड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने आपल्याच शिक्षक पत्नीचा अपघाताचा बनाव करून खून केल्याचा प्रकार आज, बुधवारी उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशयित कॉन्स्टेबल शाम अर्जुन रहेरे (वय ३२, रा. लिंगनूर-कापशी, ता. कागल) याला अटक केली.
या कॉन्स्टेबलला पत्नी पसंत नव्हती. त्यात तिला मुल होत नव्हते. म्हणून तिला ठार तरी मारायचे; परंतू त्यातून विम्याचा फायदा व्हायला हवा असे नियोजन करून त्याने खून केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खून झालेल्या महिलेचे सुनीता नामदेव केंग (रा. मुळ दिंडोरी, जि. नाशिक, सध्या गोरंबे ता. कागल) असे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, सुनीता नामदेव केंग या जून २००० पासून विद्यामंदिर गोरंबे (ता. कागल) येथे अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मार्च २००७ मध्ये त्यांचे शाम रहेरे याच्याशी लग्न झाले. रहेरे याची २०१३ मध्ये पोलीस मुख्यालयातून मुरगूड पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यामुळे त्याने पत्नी सुनीता यांची खडकेवाडा विद्यामंदिर येथे बदली करून घेतली. दोघेही लिंगनूर-कापशी येथे पोलीस चौकीच्या समोरच धनाजी यादव यांच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होते. सुनीता या २३ मे २०१४ ला पहाटे फिरायला गेल्या असता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू अशी नोंद झाली,;परंतु सुनीता यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी वर्मी घाव लागल्याचे व्रण होते. त्यामुळे नागरिकांनी घातपाताची शक्यता वर्तविली होती. कॉन्स्टेबल रहेरे याला पहाटे पावणेसहाच्या सुमारास मोटारसायकलवरून जाताना बस्तवडे, सोनगे येथील फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी पाहिले होते. रहेरे याला सोडणारा मोटारसायकलस्वार स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. २६ मे रोजी सुनीताचे भाऊ श्रीकांत नामदेव केंग व ज्ञानेश्वर केंग यांनी बहिणीचा अपघात नसून, खून झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे केली. त्यानुसार डॉ. शर्मा यांनी मुरगूड पोलिसांकडील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे दिला. गायकवाड यांनी अत्यंत कुशलतेने तपास केला.
रहेरे गेली चार वर्षांपासून पोलीस दलामध्ये काम करीत असून, त्याने नियोजनबद्ध स्वत:च्या पत्नीचा खून करून तो अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बारकाईने व कौशल्यपूर्ण तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रमेश ढाणे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख करीत आहेत. (प्रतिनिधी)