Kolhapur: तरुणांची माथी भडकविण्याचा प्रयत्न, काही तरी वेगळे घडेल; माजी गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 11:44 AM2023-05-31T11:44:47+5:302023-05-31T11:45:15+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचा काही शक्तींचा सातत्याने प्रयत्न
कोल्हापूर : बेरोजगारी, महागाई यासारख्या जनतेला त्रासदायक ठरलेल्या गोष्टींवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी अनुचित घटना घडवून तरुणांची माथी भडकविण्याचे प्रयत्न कोल्हापुरात सुरू आहेत. म्हणून येत्या दोन-तीन महिन्यात असं काही तरी वेगळे घडेल म्हणून आम्ही लवकरच पोलिस अधीक्षकांना भेटणार आहोत, असे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचा काही शक्तींचा सातत्याने प्रयत्न होत आहे. मागच्या काही वर्षात सांगली-मिरज भागात जातीय दंगल घडवून आणली गेली आणि त्याचा राजकीय फायदा विशिष्ट पक्षाला मिळाला. म्हणूनच आमच्या मनात शंका आहे की कोल्हापुरातही असेच काही तरी घडेल. कारण गेल्या काही महिन्यापासून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पाठविले जात आहेत. त्यातून तरुणांची माथी भडकविली जात आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात घडलेल्या घटना किंवा पन्हाळा येथे घडलेली घटना या समज, गैरसमज निर्माण केल्यामुळेच घडल्या आहेत. कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. या नगरीने देशाला समतेचा विचार दिला. अशा नगरीत सामाजिक ध्रुवीकरण होत आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे. म्हणून माझ्या जिल्ह्यातील तरुणांना एक विनंती आहे की, चुकीचे मेसेज येतात त्यावर विश्वास न ठेवता जातीय सलोखा बिघडविणाऱ्या घटना रोखण्याच्या कामात पुढाकार घ्यावा, असेही पाटील म्हणाले.
रंकाळ्यावर काँक्रिटीकरण नको
रंकाळा तलावावर सुरू असलेल्या विकासकामांबाबत काही नागरिक तक्रार करतात. तेथे नुसते काँक्रिटीकरण केले जाऊ नये तर त्याचे मूळ नैसर्गिक सौंदर्य तसेच रहावे, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातही महाविकास आघाडी
कोल्हापूर जिल्ह्यातही लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढविली जाईल. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून उमेदवार ठरवतील. ज्यावेळी बैठक हाेईल तेंव्हा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही तेथे आमचे म्हणणे मांडू. पण आताच कोण उमेदवार असेल हे सांगणे उचित होणार नाही, असे पाटील म्हणाले.