बाबासाहेब पुरंदरे यांच्या विकृत मांडणीवर कायमच टीका, डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण
By विश्वास पाटील | Published: December 1, 2022 10:57 PM2022-12-01T22:57:15+5:302022-12-01T22:58:37+5:30
राज ठाकरे यांनी घेतली होती पवार यांची भेट.
कोल्हापूर : "बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या इतिहासाच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर लेखनातून व संशोधनातून आयुष्यभर टीकाच केली आहे व त्या भूमिकेवर आजही ठाम आहे," असे स्पष्टीकरण ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी गुरुवारी दिले.
डॉ.पवार यांची बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:हून त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने वृत्तपत्रांत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. म्हणून डॉ.पवार यांनी त्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले.
"राज ठाकरे यांच्या भेटीत पुरंदरे यांच्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही. ते निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरे यांच्याबद्दल कांही प्रश्न विचारले. त्यावेळीही मी त्यांचे इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे कोणतेही विधान केले नाही. कारण आतापर्यंत लेखनातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे. त्यावर आजही ठाम आहे. वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याने हे स्पष्टीकरण करत आहे," असे पवार यांनी त्यात म्हटले.
याच भेटीत प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देवून त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल त्याचे मी स्वागत करेन असे मी म्हणालो होतो. माध्यमांमध्ये त्याचीही अतिशयोक्ती झाल्याचे डॉ.पवार यांनी म्हटले आहे.