बद्धकोष्ठता

By Admin | Published: March 14, 2017 09:38 PM2017-03-14T21:38:50+5:302017-03-14T21:38:50+5:30

बालस्वास्थ

Constipation | बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता

googlenewsNext


पाच वर्षांच्या राजूचे पालक त्याला संडासच्या तक्रारीसाठी घेऊन आले होते. लहानपणापासूनच तो संडासला जायची टाळाटाळ करायचा. चार-पाच दिवसांतून एकवेळा वेळी-अवेळी तो संडासला जायचा. अनेकदा संडासला जाण्याची इच्छा झाली तरी तो पायावर पाय दाबून संडासला जाणे टाळायचा. पालकांनी त्याला संडासमध्ये नेले तरी तो उभ्या-उभ्याच संडास करायचा. काहीवेळा शाळेमध्ये असतानाच त्याच्या अंडवेअरला थोडा गल चिकटलेला असायचा. संडासला जाणे हा त्याच्यासाठी वेदनाकारक अनुभव असायचा. त्याला अनेकदा खड्यासारखा संडास व्हायचा आणि अलीकडे तर काही वेळा संडासला चिकटून रक्तही पडायचे. या तक्रारीसाठी बऱ्याच डॉक्टरांच्या भेटी होऊन औषधोपचार झाले होते. त्याच्या पालकांकडे बास्केटभर औषधे जमा झालेली होती. औषधाने फारसा फरक पडत नाही, ही पालकांची तक्रार होती. बालरोगतज्ज्ञांकडे अशी मुले नेहमीच येत असतात. सर्वसाधारणपणे ३ ते ५ टक्के मुलांमध्ये अशी बद्धकोष्ठतेची समस्या दिसून येते. ज्यांना नियमितपणे रोजच्या रोज संडास साफ होत असतो, त्यांना या समस्येची तीव्रता सहसा लक्षात येत नाही. रोज सकाळी मलउत्सर्जन करून ‘निर्मल’ होणे ही एक आरोग्यदायी कृती आहे. बहुतेक लहान मुलांच्या बाबतीत बद्धकोष्ठतेचे महत्त्वाचे कारण मुलांचा चुकीचा आहार तसेच संडासला नियमितपणे जाण्याची सवय लावण्याबाबत पालकांनी केलेली चालढकल ही महत्त्वाची कारणे दिसून येतात. क्वचितप्रसंगी मतिमंद मुले, जन्मजात आतड्याचे विकार असणारी मुले, काही औषधांच्या दुष्परिणामामुळे आतड्याची होणारी अनियमित हालचाल, अशी कारणे दिसून आली तरी अशा मुलांचे प्रमाण अत्यल्प असते. मुलांमधील बद्धकोष्ठता या समस्येबाबत पालकांना काय करता येईल, याची आज माहिती घेऊया.
जन्मानंतर पहिले सहा महिने केवळ स्तनपान करणाऱ्या बाळांना बद्धकोष्ठतेचा प्रश्न कधी निर्माण होत नाही. जरी या बाळांनी रोजच्या रोज संडास केला नाही तरी त्यांना मलाचा खडा होणे, संडासच्या वेळी वेदना होणे असा त्रास कधीच होत नाही. सहा महिने ते दोन वर्षे हा काळ फार महत्त्वाचा असतो. या काळात बाळ त्याच्या आहारासाठी पालकांवर अवलंबून असते. संडास, लघवीची जाणीव या काळातच सुरू होत असते.
या काळात पालकांनी विशेष जागरूक राहण्याची आवश्यकता असते. अलीकडील काही दशकामध्ये आपला आहाराचा प्रवास पालेभाज्या, फळे, कडधान्ये, तृणधान्ये, डाळी अशा चोथायुक्त आहाराकडून प्रक्रिया केलेल्या चोथारहित रिफार्इंड अन्नपदार्थांकडे झालेला आहे. गाई-म्हशीचे दूध, बिस्कीटे, बेकरी पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, फास्ट फूड, जंकफूड, चॉकलेट, मांसाहारी पदार्थ, अंडी अशा पदार्थांमध्ये चोथ्याचे प्रमाण अल्प असल्याने आतड्याची हालचाल नियमित होत नाही. परिणामी, मल तयार होण्याची क्रिया सुलभपणे होत नाही. असा मल जास्त काळ मोठ्या आतड्यामध्ये साठून राहिल्याने त्यातून आणखीन पाणी शोषून घेतले जाते व मल खड्यासारखा घट्ट होतो. असा खडा गुदद्वारातून बाहेर जाताना आतड्याला घासून जात असल्याने संडास करताना वेदना होतात. आतड्याला आतून जखम होते. त्यातून कालांतराने रक्तही पडू शकते. असा वेदनामय प्रसंग टाळण्यासाठी मुले संडासला जाणे टाळू लागतात आणि मूळ समस्या आणखी तीव्र बनते, याचा मुलाच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
आजार झाल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा तो टाळणे केव्हाही इष्ट. जन्मानंतर बाळाला पहिले सहा महिने केवळ स्तनपान द्यावे. सहा महिन्यानंतर स्तनपान सुरू ठेऊनच डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार चालू करावा. पूरक आहारामध्ये टप्प्याटप्याने एकदल, द्विदल धान्ये, डाळ तांदळाच्या १:३ या प्रमाणमधील मिश्रणाने तयार केलेले खिचडी, इडली यासारखे पदार्थ, रवा, नाचणी यांची खीर, केळी, चिक्कू, पपई, आंबा यासारख्या गरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मूल थोडे मोठे झाल्यावर पालेभाज्या, मोड आलेली धान्ये, गाजर, काकडी, मुळा, टोमॅटो असे कोशिंबीर करण्याचे पदार्थ अशा चोथायुक्त पदार्थांनी समतोल आहार द्यावा. त्यासोबत मूल दोन तीन वर्षांचे झाल्यापासूनच त्याला नियमितपणे संडासच्या जागी बसवावे; जेणेकरून मुलाच्या आतड्याला नियमित मलउत्सर्जनाची सवय होऊन जाईल. त्यातून ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू झाला आहे त्यांनी नाऊमेद होऊ नये. त्यांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार दीर्घकाळ चिकाटीने उपाय करावे लागतात. योग्य आहार, नियमितपणे संडास करण्याची सवय यासोबत काही औषधोपचार, मानसिक आधार, नियमित संडास झाल्यास बक्षीसरूपी प्रोत्साहन अशा सर्व मार्गाचा अवलंब केल्यास या मुलांचे शालेय आणि सामाजिक जीवन सुकर बनू शकेल.


- डॉ. मोहन पाटील

Web Title: Constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.