विकृत राष्ट्रवादाला संविधान हेच उत्तर : मेधा पाटकर, संविधान सन्मान यात्रेचे कोल्हापुरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:47 AM2018-10-23T10:47:34+5:302018-10-23T10:50:48+5:30

संविधानवर हात ठेवून, शपथ घेऊन, सत्तेवर आलेलेच संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. याला विरोध करण्यासाठी एकजुटीचे आव्हान आपल्यासमोर आहे. सध्या देशभर पसरलेल्या विकृत राष्ट्रवादाला संविधान हेच समर्थ उत्तर असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

Constitution of distorted nationalism is the only answer: Medha Patkar, Constitution of Honor, welcome to Kolhapur | विकृत राष्ट्रवादाला संविधान हेच उत्तर : मेधा पाटकर, संविधान सन्मान यात्रेचे कोल्हापुरात स्वागत

कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवन येथे संविधान सन्मान यात्रेच्या निमित्ताने विविध राज्यांतील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी अथकपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सुरेखा दळवी, सुनीती सु. र., मेधा पाटकर, महापौर शोभा बोंद्रे, दशरथ पारेकर, टी. एस. पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देविकृत राष्ट्रवादाला संविधान हेच उत्तर : मेधा पाटकरसंविधान सन्मान यात्रेचे कोल्हापुरात स्वागत

कोल्हापूर : संविधानवर हात ठेवून, शपथ घेऊन, सत्तेवर आलेलेच संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. याला विरोध करण्यासाठी एकजुटीचे आव्हान आपल्यासमोर आहे. सध्या देशभर पसरलेल्या विकृत राष्ट्रवादाला संविधान हेच समर्थ उत्तर असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

संविधान सन्मान यात्रेच्या निमित्ताने शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. दांडीहून निघालेल्या या यात्रेचे सकाळी ११ नंतर दसरा चौकामध्ये झांजपथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून सर्व मान्यवर आणि कार्यकर्ते शाहू स्मारक भवनमध्ये आले. महापौर शोभा बोंद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या यात्रेला सदिच्छा दिल्या.

मेधा पाटकर म्हणाल्या, सध्या सत्तेवर असणाऱ्यांचे ‘भक्ष्य’आणि ‘लक्ष्य’ ठरलेले आहे. याच सत्ताधाऱ्यांनी ‘सर्वधर्मसमभाव’आणि ‘समाजवाद’ हे दोन शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र आपणा सर्वांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना हे शक्य झालेले नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या या देशामध्ये जातिधर्माच्या अस्मितेला खतपाणी घालून हिंसा घडवण्याची हिंमत होते कशी? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संविधानाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या संविधान सन्मान यात्रेचे कोल्हापूरमध्ये झांजपथकाच्या निनादात स्वागत करण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

दलितांवर अत्याचार होत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. महात्मा गांधींचा खून करणारे कोण आहेत, हे अभिमानाने सांगून त्यांचा पुतळा उभारणारे शरमिंदे का होत नाहीत, अशीही विचारणा त्यांनी केली.
सध्य:स्थितीचे वर्णन करताना पाटकर म्हणाल्या, खासगी शिक्षण संस्थांचा धंदा जोरात चालला आहे, तर दुसरीकडे सरकारी शाळा ओस पडायला लागल्या आहेत.

वाळूमाफियांनी उच्छाद मांडला आहे. ३५०० कोटी रुपये खर्च करून आता सरदार पटेल यांचा पुतळा उभारला जात आहे आणि त्यासाठी १५०० चीनी मजूर काम करत आहेत. या ठिकाणी शेकडो वर्षांपूर्वीची झाडे तोडून आता पर्यटन केंद्र होणार आहे. यासाठी आॅईल कार्पोरेशनचा पैसा वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मीराबहन तेलंगणा म्हणाल्या, देशातील सध्याचे वातावरण एकमेकांपासून तोडणारे बनत चालले असताना संविधान हे सर्वांना जोडणारा धागा आहे. संविधान वाचवण्यासाठी महात्मा गांधींच्या मार्गाने कार्यरत राहण्याची गरज आहे.
मधुरेशकुमार म्हणाले, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे व इतरांच्या हत्या झाल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला. संविधानातील मूल्ये जोपासण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

सुरेखा दळवी म्हणाल्या, केवळ एका व्यक्तीची ‘मन की बात’ सुरू असून कुठेही लोकांचे राज्य दिसत नाही. अधिकारांचा संकोच वाढला आहे. हे केवळ आमच्यासमोरचे प्रश्न नाहीत, तर ते सामान्य माणसांचे प्रश्न आहेत. म्हणूनच त्यांनीही या चळवळीत उतरण्याची गरज आहे. कोल्हापूर हे चळवळींचे तीर्थक्षेत्र आहे.

उत्तर प्रदेशहून आलेले योगिराज म्हणाले, आधीच्या सरकारने आश्वासने पूर्ण केली नाहीत, भ्रष्टाचार केला म्हणून या सरकारला निवडून दिले; मात्र धार्मिक सरकारला लोकांनी कसे निवडून दिले हा आमच्यासमोरचा प्रश्न असून काँग्रेस आणि भाजप वगळूनही तिसºया पर्यायाचा विचार करणे आवश्यक आहे.

सुनीती सु. र. म्हणाल्या, देशभरातून आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना कोल्हापुरात सशक्त पुरोगामी विचार पाहावयास मिळत आहे. विनाशकारी विकास आणि आक्रमक हिंदुत्ववाद ही आपल्यासमोरील मोठी आव्हाने आहेत. यावेळी पूनम कनोजिया यांचेही भाषण झाले. ही यात्रा झाल्यानंतरही आम्ही स्वस्थ बसणार नाही, तर गावागावांत जाऊन संविधानाचा जागर करणार असल्याचे प्रास्ताविकात प्राचार्य टी. एस. पाटील यांनी सांगितले.

सुरुवातीला शाहीर राजू राऊत व अन्य शाहिरांनी पोवाडा सादर केला. विवेक वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी संविधानाची ओवी सादर केली. संभाजी जगदाळे, रवि जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर दशरथ पारेकर यांनी आभार मानले. यावेळी उदय कुलकर्णी, दिलीप पोवार, व्यंकाप्पा पत्की, बळवंतराव मोरे, सुरेखा जगदाळे, सीमा पाटील, प्रसाद कुलकर्णी, भरत लाटकर, शिवाजीराव परुळेकर, नामदेव गावडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उस्मानाबादहून ३५ महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या.

भगवी पट्टी बांधून घोषणा देत नाही

आमचा कार्यकर्ता डोक्याला भगवी पट्टी बांधून झिंदाबादच्या घोषणा देत नाही, तर तो विवेकाने घोषणा देतो, असे सांगत सुनीती सु. र. यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

संविधान हेच आमचे आधारकार्ड

यावेळी मेधा पाटकर यांनी देशातील सध्य:स्थितीचा आढावा घेतानाच आता सर्वत्र आधारकार्डचा बोलबाला आहे; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हेच आमचे आधारकार्ड असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट करताच सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

आर्थिक, सामाजिक प्रश्न एकत्रच

सातारा येथे बोलताना हमीद दाभोळकर यांनी बदलत्या युवकांच्या मनोभूमिकेचा विचार करून जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आर्थिक प्रश्नांपेक्षा सामाजिक प्रश्नांना अधिक प्राधान्य देण्याचा मुद्दा विचारार्थ मांडला; मात्र आर्थिक आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न वेगळे करून चालणार नाही, अशी आपली भूमिका असल्याचे मेधा पाटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


 

Web Title: Constitution of distorted nationalism is the only answer: Medha Patkar, Constitution of Honor, welcome to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.