धामणी खोऱ्यात मातीचे बंधारे उभारण्याची लगबग
By Admin | Published: November 15, 2016 11:59 PM2016-11-15T23:59:49+5:302016-11-15T23:59:49+5:30
शेतकऱ्यांचे हात गुंतले श्रमदानात : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धडपड
महेश आठल्ये ल्ल म्हासुर्ली
दिवाळीची धामधूम संपताना आणि सुगीचे दिवस सुरू असताना धामणी खोऱ्यात मात्र संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धामणी नदीवर मातीचे बंधारे बांधण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांचे हात श्रमदानात गुंतले असल्याचे चित्र सध्या धामणी खोऱ्यात पाहावयास मिळत आहे.
तीन तालुक्यांत विभागलेल्या धामणी खोऱ्यात मुबलक शेती आहे. पावसाळ्यात तब्बल चार महिने जोरदार पाऊस पडतो; मात्र एकही साठवण प्रकल्प नसल्याने पडणारे सर्व पाणी वाहून जाते व फेब्रुवारीनंतर खोऱ्यास पाणीटंचाईच्या भीषण संकटास सामोरे जावे लागते. ऐन उन्हाळ्यात पिकांसह पिण्यालाही पाणी मिळत नाही. त्यामुळे या खोऱ्याच्या पाचवीलाच पाणीटंचाई पुजलेली आहे. मात्र या खोऱ्यातील बळिराजा मात्र जिद्दी असल्याने आपली शेती पावसाळ्यापर्यंत कशीबशी जगविण्यासाठी तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच नदीवर सुमारे १०-१२ ठिकाणी मातीचे बंधारे श्रमदानाने व स्वखर्चाने बांधून त्यामध्ये पाणी अडवून ते स्वयंशिस्तीने पुरवून यावरून शेती जगविण्याची केविलवाणी धडपड करतो. यासाठी प्रसंगी तो गोठ्यातील जनावरे वा कणगीतील धान्यही विकण्यास मागेपुढे पाहत नाही. सध्या या खोऱ्यात धामणी नदीवर १० ते १२ ठिकाणी माती, झाडांच्या फांद्या वापरून बंधारे बांधले जात आहेत. त्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले जात आहेत.
धामणी नदीवर राही (ता. राधानगरी) येथे ३.८५ क्षमतेच्या मध्यम प्रकल्पाला १९९४ ला युती सरकारच्या काळात मंजुरी मिळून सन २००० मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले. मात्र, आजपावेतो ६० टक्क्च्यांवर काम होऊनही गेली दहा वर्षे काम बंद असून, सिंचन घोटाळ्यातील चौकशीच्या फेऱ्यातून हा प्रकल्प बाहेर निघून त्यास सु. प्र. मा. मिळाली व नुकतीच निधीसह मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. मात्र, दिवाळीत काम सुरू होण्याची चर्चा फक्त चर्चाच राहिली असून, धामणीवासीयांचे लक्ष या कामाच्या सुरुवातीकडे लागले आहे. दोन वेळा आंदोलन होऊनही कामास सुरुवात न झाल्याने साशंकता व्यक्त होत आहे.
काम सुरू होण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन वर्षे पूर्ण क्षमतेने काम केल्यास येत्या दोन वर्षांत
काम पूर्ण होऊन धामणी नदी दुथडी भरून वाहून या खोऱ्यात कृषिक्रांती होणार आहे.