पूरक्षेत्रातील बांधकामेच महापुरास कारणीभूत : अजित पवार : अलमट्टी धरणाचा महापुराशी संबंध नसल्याचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:25 AM2021-07-28T04:25:59+5:302021-07-28T04:25:59+5:30
कोल्हापूर : नदीपात्रात झालेली बांधकामे हे एक महापुराचे महत्त्वाचे कारण असल्याचा निष्कर्ष राज्य शासनाने नेमलेल्या वडनेरे समितीने काढला आहे. ...
कोल्हापूर : नदीपात्रात झालेली बांधकामे हे एक महापुराचे महत्त्वाचे कारण असल्याचा निष्कर्ष राज्य शासनाने नेमलेल्या वडनेरे समितीने काढला आहे. त्यामुळे अशा बांधकामांवर आता कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीला आलेल्या महापुराशी अलमट्टीच्या धरणाचा काही संबंध नसल्याचा अहवाल तज्ज्ञ समितीने यापूर्वीच दिला असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. नदी-नाल्यांचे मूळ प्रवाह खंडित करणारी अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत कठोर निर्णय घेतले जातील. अशी अतिक्रमणे काढून टाकण्यात जे अधिकारी हयगय करतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.
महापुरास ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत आहे. त्यामुळेच चीन-जर्मनीतही हजार वर्षांत झाला नाही इतका पाऊस झाला हे खरे असले तरी पूरक्षेत्रातील बांधकामेही तितकीच जबाबदार असल्याचे मत त्यांनी नोंदविले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पूर रोखण्यासाठी भिंत बांधण्याबाबतचा निर्णय झाला नसून तो एक पर्याय आहे. मदतीच्या पॅकेजबाबतही कुणी काही घोषणा केल्या तरी आज, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच त्याबाबत निर्णय होईल. मागील तीन महापुरांचा अभ्यास करून किती पातळीपर्यंत पाणी आले होते व तेवढे पाणी आल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील, असा पूरग्रस्त प्रत्येक तालुक्याचा आराखडा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्थलांतरापासून जीवितहानी टाळता येणे शक्य होईल.
---
राधानगरी धरणाला दरवाजे करण्याबाबत..
राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पूर्ण धरण भरल्यानंतरच उघडले जातात. त्यावेळी पावसाचाही जोर असतो. त्यामुळे पूरस्थिती बिकट होते. धरणाचे नियमित पाणी सोडण्याचे पाच दरवाजे आहेत; परंतु त्यांतील दोन खासगी तत्त्वावरील वीजनिर्मितीसाठी दिले आहेत. राहिलेल्या तीन दरवाजांतून पावसाळ्यातून पाणी सोडणे शक्य नसते; कारण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने उघडलेले दरवाजे पुन्हा बसविता येत नाहीत. त्यामुळे धरणांतील पाणी धरण भरण्यापूर्वी सोडायचे असेल तर दरवाजे करण्याबाबत चर्चा झाली. स्वयंचलित दरवाजे व एकूणच शाहूकालीन या धरणाबाबत लोकभावना तीव्र आहेत; परंतु लोकांचा जीवही महत्त्वाचा असल्याने तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन धरणाच्या दरवाजांबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
शाहूवाडीत २० ठिकाणी डोंगर घसरले
शाहूवाडी तालुक्यात २० ठिकाणी डोंगर-दरड घसरून पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांची नुकसान भरपाई देताना जमीन खागलून जे नुकसान झाले त्याचाही विचार करावा लागेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
सबमर्सिबल पंपसाठी निधी
कोल्हापूर शहरात पाणी योजनेचे पंप पुरात अडकल्याने लोकांची पिण्यासाठी तारांबळ उडाली. त्यामुळे उपसा केंद्राच्या ठिकाणी सबमर्सिबल पंप बसवता येतील का हे तपासून घ्या, त्यासाठी आवश्यक तो निधी देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.